प्रमोशनच्या पैशांसाठी आणखी एक संघटना मैदानात
By admin | Published: December 29, 2015 12:39 AM2015-12-29T00:39:36+5:302015-12-29T00:39:36+5:30
आम्ही शासनाच्या नाही तर ठाणे महापालिकेच्याच सेवा घेत असल्याने आम्हाला आश्वासित निवडश्रेणी (प्रमोशन शक्य नसल्यास त्याऐवजी पैसे) मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका
ठाणे : आम्ही शासनाच्या नाही तर ठाणे महापालिकेच्याच सेवा घेत असल्याने आम्हाला आश्वासित निवडश्रेणी (प्रमोशन शक्य नसल्यास त्याऐवजी पैसे) मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हा यांनी घेतली आहे. पालकमंत्र्यांचे आदेश पाळा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाला दिला.
आश्वासित निवडश्रेणीपासून ठाणे महापालिकेतील सुमारे ४०० हून अधिक शिक्षक वंचित असल्याचे वृत्त सोमवारी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच शिक्षकांच्या इतर संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हा यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाला एक निवेदन दिले असून त्यांच्या दुटप्पी धोरणाचा निषेध केला आहे. लेखापरीक्षणात ज्या मुद्यावर ठपका ठेवून आठ कोटींची वसुली करण्याचे आदेश दिले होते, ते आदेश महासभेनेच रद्द केले असून यावर सकारात्मक चर्चासुद्धा झाली आहे. त्यामुळे अशा प्रकारे पुन्हा दिलेल्या पैशांची वसुली करणे चुकीचे असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षकसेना, ठाणे जिल्हाचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी व्यक्त केले आहे.
आम्ही शासनाच्या कोणत्याही सेवांचा लाभ घेत नसून वरिष्ठ वेतनश्रेणीही मिळणे आम्हास बंधनकारक असल्याचेही त्यांनी या निवेदनात नमूद केले आहे. ठाणे महापालिकेत सत्ता शिवसेनेची असतानाही अशा प्रकारे त्यांनीच दिलेले आदेश शिक्षण विभाग मानत नसेल तर मग आम्हाला आंदोलनच करावे लागेल, अशी भूमिका त्यांनी मांडली. एकूणच नियमानुसार २४ वर्षे सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांना आश्वासित निवडश्रेणी मिळालीच पाहिजे, अशी भूमिका आता शिक्षकांनी घेतली असून वेळ पडल्यास सत्तेत असूनही आम्हाला आंदोलन करावे लागेल, असे म्हटले आहे.