पाच कोटींच्या ट्रामाडोलप्रकरणी आणखी एकाला अटक
By जितेंद्र कालेकर | Published: February 3, 2019 10:59 PM2019-02-03T22:59:45+5:302019-02-03T23:05:54+5:30
इसिससारख्या इतिरेकी संघटनांकडून ‘फायटर ड्रग्ज’म्हणून मोठया प्रमाणात उपयोगात आणले जाणाऱ्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे.
ठाणे : भारतासह अनेक देशांमध्ये बंदी असलेल्या ‘ट्रामाडोल हायड्रोक्लोराइड’ या ‘फायटर ड्रग्ज’च्या तस्करीप्रकरणी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने संजय शुक्ला (३३) या आणखी एकाला नुकतीच अटक केली आहे. त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटनांकडून ट्रामाडोलचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्यामुळे या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इसिसमध्ये ‘फायटर ड्रग्ज’ अशी ओळख असलेल्या ट्रामाडोलची ठाण्यातून परदेशात समुद्रमार्गे तस्करी होणार होती. तत्पूर्वीच, त्याची निर्मिती करणाºया संतोष पांडे याच्यासह चौघांना १२ लाख ७९ हजार ५०० रुपयांच्या (आंतरराष्टÑीय बाजारपेठेत पाच कोटींच्या किमतीच्या) नऊ हजार ६३० स्ट्रीप्समधील ट्रामाडोलसह मयूर मेहता, रोमेल वाज, संतोष पांडे आणि दीपक कोठारी या चौघांना वेगवेगळ्या ठिकाणांहून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या पथकाने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अटक केली होती. याच प्रकरणाच्या चौकशीतून निलेश शुक्ला याचे नाव समोर आले. शुक्ला याने आॅगस्ट २०१८ मध्ये पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून अविनाश बारी याचा खून केला होता. याच खून प्रकरणात त्याला मुंबईच्या एमआयडीसी पोलिसांनी अटक केली होती. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयीन कोठडीतून म्हणजे कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर त्याने या प्रकरणामध्ये त्याचाच भाऊ संजय शुक्ला याचाही समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलिसांनी त्याला ३१ जानेवारी २०१९ रोजी अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला ८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश १ जानेवारी रोजी दिले. संजयचा या प्रकरणामध्ये कितपत सहभाग आहे, त्याने हे ट्रामाडोल कोणाच्या परवानगीने मुंबई परिसरात विक्रीसाठी आणले, याचाही आता शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले
काय आहे ट्रामाडोल?
ट्रामाडोलचा जखमेची तीव्रता कमी करण्यासाठीही वापर होतो. वेदनाशामक असल्यामुळे ‘इसिस’सारख्या अतिरेकी संघटना त्याचा वापर गोळीबार किंवा बॉम्बस्फोटांमध्ये जखमी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात करतात. याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये एप्रिल २०१८ मध्ये त्यावर बंदी घातलेली आहे. भारतासह अनेक देशांनीही त्यावर बंदी घातली आहे..