ठाण्यात आणखी एका पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू: २४ तासातच १५ पोलीस झाले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2020 09:42 PM2020-09-06T21:42:46+5:302020-09-06T21:47:10+5:30
ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील उपनिरीक्षक बाबा दडस यांचा कोरोनामुळे नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे शहर मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बाबा दडस (४८) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. आतापर्यंत १८ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांमध्ये शांतीनगरच्या एका उपनिरीक्षकासह ठाणे शहर आयुक्तालयातील १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या काही दिवसांपासून पोलिसांमध्ये कोरोनाचे प्रमाण कमी होत गेले होते. १७ आॅगस्ट रोजी नौपाडा, भोईवाडा आणि मोटार परिवहन विभागातील प्रत्येकी एक अशा केवळ तिघांना लागण झाली होती. त्यानंतर, हे प्रमाण ब-यापैकी नियंत्रणात आले होते. परंतु, गणेशोत्सव, मोहरम या सणांचा बंदोबस्त आणि अनलॉकच्या प्रक्रियेकडे वाटचाल सुरू असल्यामुळे शहरातील बाजारपेठांसह अनेक भागांमध्ये नागरिकांची वर्दळ आहे. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनाही पुन्हा रस्त्यावर उतरावे लागले आहे. त्यामुळे नागरिकांच्या संपर्कामुळे शांतीनगरचे एक, तर खडकपाडा येथील दोन अधिकारी बाधित झाले. यामध्ये एका महिला अधिका-याचाही समावेश आहे. रविवारी बाधित झालेल्यांमध्ये मुख्यालयाचे तीन कर्मचारी, खडकपाडा, बाजारपेठ, बदलापूर, शिवाजीनगर, वर्तकनगर, वाहतूक शाखा आणि विठ्ठलवाडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे दोघेजण बाधित झाले आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्यांच्या संपर्कातील पोलीस आणि नागरिकांचीही माहिती घेण्यात येत आहे.
*आतापर्यंत १२९ अधिकारी आणि ११७६ कर्मचारी असे एक हजार ३०५ पोलीस बाधित झाले आहेत. १०९ अधिकाºयांसह १०५५ कर्मचारी अशा एक हजार १६४ पोलिसांनी कोरोनावर मात केली असून १८ पोलिसांना जीव गमवावा लागल्याची माहिती सूत्रांनी दिली.
*ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील पोलीस उपनिरीक्षक बाबा दडस (४८) यांचा कोरोनावरील उपचारादरम्यान नवी मुंबईतील महात्मा गांधी मिशन मेडिकल कॉलेज अॅण्ड हॉस्पिटल (एमजीएम) कामोठे येथे ६ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. हा शहर पोलीस दलातील अठरावा मृत्यू आहे. नवी मुंबईतील कामोठे भागात वास्तव्याला असलेल्या दडस यांना २७ आॅगस्ट रोजी थंडी, अंगदुखी, सुका खोकला आणि दम लागून श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यामुळे ३० आॅगस्ट रोजी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा २ सप्टेंबर रोजी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रविवारी मृत्यू झाल्याची माहिती एमजीएम रुग्णालयाने दिली.