भाजपाचा शिवसेनेला आणखी एक धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 01:54 AM2017-12-05T01:54:03+5:302017-12-05T01:55:51+5:30
मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत
मीरा रोड : मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत आणल्याने वादंग निर्माण झाला आहे. त्यातच भाजपाने त्याच महासभेत नवघर गावामागे दफनभूमीसाठी जागा देण्याचा प्रस्ताव आणला आहे. यावरुन स्थानिक चारही शिवसेना नगरसेवकांसह रहिवाशांनी भाजपाविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
८ डिसेंबरच्या महासभेत महापौर डिम्पल मेहता यांनी नवघर गावामागील आरक्षण क्र. १२२ मधील क व ड ची जागा ही दफनभूमीसाठी बोहरा समाजास देण्याचा प्रस्ताव आणला आहे. शिवसेनेसह स्थानिक ग्रामस्थ व रहिवाशांचा सुरवातीपासूनच यास विरोध आहे. आधीच या ठिकाणची स्मशानभुमीची जागा अपुरी पडत आहे. भार्इंदर पूर्व भागात नवघर, गोडदेव आदी परिसरात त्या समाजाची नाममात्र वस्ती असताना त्या समाजाला दफनभूमीची आवश्यकता का, असा प्रश्न रहिवाशांसह शिवसेनेकडून आधीपासूनच केला जात होता. जेथे निकड आहे त्या भार्इंदर पश्चिम किंवा मीरा रोड भागात दफनभूमी विकसित करावी, असा सूर त्यांनी लावला होता. त्यामुळे या आधी देखील दोन वेळा प्रयत्न करण्यात आला, पण विरोधामुळे हा मुद्दा बारगळला होता.
पालिका निवडणुकीत ६१ जागा भाजपाने जिंकल्या असल्या, तरी नवघर परिसरात शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले आहेत. स्पष्ट बहुमत मिळाल्याने पालिकेत भाजपा नेतृत्वाने शिवसेनेला व पर्यायाने आमदार प्रताप सरनाईक यांना टार्गेट केले आहे. शिवसेना नगरसेवकांच्या कुटुंबियांशी संबंधित बांधकाम नोटीस न देताच जमीनदोस्त केल्यानंतर महासभेत सरनाईक यांच्या अनेक वर्षांपासूनच्या पाठपुराव्याने काशिमीरा येथे आकार घेत असलेले शहरातील पहिल्या नाट्यगृहाचे काम रद्द करण्याचा प्रस्ताव भाजपाने आणला आहे. उध्दव ठाकरे यांनी त्याचे भूमिपूजन केले होते. सेनेला नाट्यगृहावरुन डिवचणाºया भाजपाच्या स्थानिक नेतृत्त्वाने त्याच महासभेत शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या नवघर गावामागे दफनभूमी विकसित करण्यासाठी ती जागा बोहरा समाजाला देण्याचा प्रस्ताव आणला.
प्रभागातील शिवसेनेचे प्रवीण पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील व अनंत शिर्के या चारही नगरसेवकांनी पत्रक काढून भाजपाचा निषेध केला आहे. भाजपाच्या या तेढ निर्माण करणाºया कुटील डावाविरुध्द आंदोलनासाठी ग्रामस्थ व रहिवाशांनी तयार रहावे, असे आवाहनही केले आहे. भार्इंदर पूर्व परिसरात बोहरा समाजाची लोकवस्ती नसताना भाजपाने राजकीय फायद्यासाठी तसेच नागरिकांनी सेनेला मतदान केल्याने त्याचा राग काढण्यासाठी हा बनाव केल्याचा आरोप केला आहे.