विरारमधील हार्दिकच्या शिरपेचात आणखीन एक तुरा, युरोप खंडात १४ दिवसात दोन आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2023 08:04 PM2023-08-26T20:04:34+5:302023-08-26T20:05:10+5:30
देश विदेशातील स्पर्धेत सहभाग
नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारचा आयर्नमॅन म्हणून ओळख असलेल्या हार्दिक पाटीलने युरोप खंडात एस्टोनिया व स्वीडन देशात १४ दिवसात एकापाठोपाठ एक अशा दोन पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करून एक नवीन विक्रम केला आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे हार्दिकने २२ वेळा पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा यशस्वी करणारा दुसरा भारतीय ठरला आहे. “ हाल्फ आयर्नमॅन” स्पर्धा शर्यत १९ वेळा यशस्वीरित्या पूर्ण करणारा विक्रमदेखील हार्दिकच्याच नावावर आहे. ५ ऑगस्टला युरोप खंडात हार्दिकने एस्टोनिया येथे २१ वी व लगेच १९ ऑगस्टला स्वीडन येथे २२ वी पुर्ण आयर्नमॅन स्पर्धा पुर्ण केली आहे. हार्दिकच्या या यशाबद्दल वसईकरांची मान अभिमानाने उंचावली असुन त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावणे असे स्पर्धेचे स्वरूप होते. ते १७ तासांत पूर्ण करण्याची निर्धारित वेळ होती पण त्याने १३ तास १० मिनिटांत ही स्पर्धा पूर्ण केली आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. जगभरात सहा ठिकाणी झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणारा तो एकमेव हिंदुस्थानी ठरला आहे.
देश विदेशातील स्पर्धेत सहभाग
यापूर्वी हार्दिकने आशिया खंड, यूरोप व अमेरिका या तिन्ही खंडातील डेन्मार्क, स्वीडन, ऑस्ट्रेलिया, मेक्सिको, तैवान, न्युझीलँड, अमेरिका, एस्टोनिया, मस्कत, अरीझोना, फ्लोरिडा, दुबई, गोवा, इंडोनेशिया या देशांमध्ये पूर्ण व अर्थ आयर्नमॕन स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता.