ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रक उलटल्याने चार तास वाहतुकीवर परिणाम

By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2023 07:37 PM2023-12-29T19:37:37+5:302023-12-29T19:37:45+5:30

पाेलिस आयुक्तांनीही घेतली दखल

Another truck overturned in Thane for the second consecutive day, affecting traffic for four hours | ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रक उलटल्याने चार तास वाहतुकीवर परिणाम

ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा ट्रक उलटल्याने चार तास वाहतुकीवर परिणाम

ठाणे: घोडबंदर रोडवर टँकर पाठोपाठ शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास ट्रक उलटला. या अपघातामुळे या मार्गावर पुन्हा चार तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता. वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्यामुळेच हाही अपघात झाला असून सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झालेली नाही. पहाटेच्या सुमारास चार तासांनी ही वाहतूक पूर्वपदावर आली. त्यामुळे कामानिमित्त निघालेल्या नोकरदारांना मात्र काही प्रमाणात याची झळ सोसावी लागली.

कोल्हापूरच्या इचलकरंजी भागातून चालक प्यारेलाल बन्सीलाल हे ट्रकमध्ये १२ टन कापड घेऊन जोधपुर-राजस्थान येथे निघाले होते. ठाण्यातील घोडबंदर रोडमार्गे जाताना शुक्रवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास त्यांचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे या ट्रकचा वाघबीळ ब्रिजजवळ उलटून अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलिसांनी धाव घेतली. तसेच अपघातग्रस्त ट्रकला पोलिसांच्या उपस्थितीत दोन हायड्रा मशीनच्या मदतीने सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आले. त्यानंतर पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास या रस्त्यावरील वाहतुक पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. मात्र, त्यानंतरही सकाळी खासगी तसेच सार्वजनिक वाहनांनी कामावर निघालेल्या चाकरमान्यांना या कोंडीचा काही प्रमाणात फटका सहन करावा लागला.

वाहतूक नियंत्रणाचे पाेलिस आयुक्तांचे आदेश-
शुक्रवारी सायंकाळीही माजीवडा ते खारेगाव या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. या कोंडीची माहिती मिळताच पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी तातडीने याची दखल घेतली. त्यांनी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांना ही वाहतूक सुरळीत करण्याचे आदेश दिले. त्यानंतर ही वाहतूक अर्ध्या तासात सुरळीत झाली.

Web Title: Another truck overturned in Thane for the second consecutive day, affecting traffic for four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.