डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:05 AM2017-07-19T01:05:34+5:302017-07-19T01:05:34+5:30

सीएच्या फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान डोंबिवलीतील राज परेश शेठ याने मिळवला आहे. त्याच्या

Another turtle in Dombivli's head | डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा

डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक तुरा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : सीएच्या फायनल परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत देशात पहिला येण्याचा मान डोंबिवलीतील राज परेश शेठ याने मिळवला आहे. त्याच्या पहिल्या येण्याने डोंबिवलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मे महिन्यात झालेल्या सीएच्या फायनल परीक्षेला राज बसला होता. ‘इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंट आॅफ इंडिया’ या संस्थेने घेतलेली परीक्षा त्याने दिली होती. त्यात राजला ८०० गुणांपैकी ६३० गुण (७८.७५ टक्के) मिळाले आहेत. ६३० गुण मिळवत राज हा देशात पहिला आला आहे. राजने त्यासाठी खासगी क्लास लावला होता. सुरुवातीला तो दररोज दोन तास अभ्यास करत होता. त्यानंतर अभ्यासाचे तास वाढवले. शेवटच्या महिन्यांमध्ये तो दररोज १२ तास अभ्यास करायचा.
राज याने सांगितले की, मेरीटमध्ये येईन याची मला खात्री होती. मात्र देशात पहिला येईन असे वाटले नव्हते. अभ्यास खूप केला होता. पेपर चांगले गेले होते. निकाल लागला आणि मी पहिला आलो तेही देशात पहिला आलो हे कळल्यावर मला चांगले वाटले. माझ्याहीपेक्षा माझ्या मित्र-मैत्रिणी, शिक्षक, कॉलेज, आई-वडील आणि माझ्या बहिणींना फार मोठा आनंद झाला आहे.
राज हा डोंबिवली पश्चिमेतील महात्मा गांधी रोडवरील महालक्ष्मी इमारतीत राहतो. त्याचे वडील परेश हे डायमंड मार्केटमध्ये मुंबईला कामाला होते. सध्या ते निवृत्त झाले आहेत. आई ज्योत्स्ना ही गृहिणी आहे. त्याला दोन बहिणी आहेत. त्यापैकी एक बहीण एम. कॉमला आहे. तर दुसरी एमबीएचे शिक्षण घेत आहे. राजचे शालेय शिक्षण हे येथील विद्यानिकेतन शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण माटुंगा येथील पोतदार कॉलेजमध्ये झाले. इयत्ता दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे त्याने त्या वेळीच त्याच्या करिअरची दिशा ठरविली होती. त्याच वेळी त्याने सीए व्हायचे, असे मनाशी ठरविले होते. त्याच दिशेने तो अभ्यास करत होता. करिअरचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्याने मेहनत घेतल्याने त्याला यश मिळाले आहे.

राज म्हणजे ‘जिनिअस’
विद्यानिकेतन शाळेचे संस्थापक विवेक पंडित यांनी सांगितले, माझ्या शाळेतील विद्यार्थी राज प्रथम आला ही अभिमानास्पद बाब आहे. यापूर्वीही माझ्या शाळेतील रोहन दीक्षित याने सीए फायनलच्या परीक्षेत देशात तिसरा येण्याचा मान मिळवला होता. राज हा पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता. त्याचे वर्णन ‘जिनिअस’ असेच करावे लागेल. सीएच्या परीक्षेत यश मिळविण्याची परंपरा दीक्षितच्या पाठोपाठ राजने केवळ कायम केली नसून पहिला आला आहे.

कल्याणचा सिद्धार्थ अय्यर देशात १७वा
कल्याणच्या सिद्धार्थ अय्यर याने सीएच्या फायनल परीक्षेत १७ वा आला आहे. त्याला ८०० पैकी ५६० गुण मिळाले आहेत. त्याचे शालेय शिक्षण सेंट मेरी या कल्याणच्या शाळेत झाले. त्याचे पदवीचे शिक्षण मुलुंडच्या कॉलेज आॅफ कॉमर्समध्ये झाले आहे. तो परीक्षेच्या पाच महिने पूर्वीपासून १२ तास अभ्यास करीत होता. १५ ते २५ क्रमांकाच्या आत त्याचा नंबर येईल, अशी त्याला खात्री होती. त्याने खाजगी क्लास लावला होता. त्याला त्याच्या निकालाची बातमी या संस्थेकडून मिळाली. त्याचे वडील शंकर नारायणन् हे अकाउंटंट आहेत. त्याची आई श्रीविद्या ही गृहिणी आहे. परीक्षा देण्याच्या आधीपासून तो सीव्हीके या संस्थेत इंटर्नशीप करीत आहे. त्याला फायनान्समध्ये काम करायचे आहे. आठ विषयांपैकी त्याला आयएससीए हा विषय कठीण वाटत होता. त्या विषयातही त्याला १०० पैकी ५२ गुण मिळाले आहेत. वेळेचे नियोजन, कठोर मेहनत आणि स्मार्ट वर्कच्या आधारे हे यश मिळाले असून त्याने त्याचे श्रेय गुरूजन, आई-वडील आणि मित्र-मैत्रीणींना दिले आहे.

Web Title: Another turtle in Dombivli's head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.