रंगरंगोटीच्या कामात थुकपट्टी आमदार आव्हाडांचे पालिकेच्या विरोधात आणखी एक ट्विट
By अजित मांडके | Published: February 15, 2023 05:31 PM2023-02-15T17:31:55+5:302023-02-15T17:50:12+5:30
बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जबरदस्त कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात आव्हाडांचे रोजच्या रोज टीव्टही सध्या वादळी ठरत आहे.
ठाणे : बाळासाहेबांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या जबरदस्त कलगीतुरा सुरु झाला आहे. त्यात आव्हाडांचे रोजच्या रोज टीव्टही सध्या वादळी ठरत आहे. त्यांनी आता टीव्ट करीत महापालिकेच्या विविध अधिकाऱ्यांवर निशाना साधला असतांनाच आता शहरभर सुरु असलेल्या रंगरंगोटीच्या कामाबाबतही त्यांनी केलेले ट्विट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रंगरंगोटीचे जे टेंडर काढण्यात आले आहे, त्यात ज्या काही अटी शर्तीने कामे होणे अपेक्षित होते, त्यानुसार कामे न होता केवळ थुकपट्टी लावली जात असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीने कोणाला मिळाले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
मागील काही दिवसापासून बाळासाहेबांची शिवसेना आणि आव्हाड यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. आता आव्हाडांचा अंत सुरु झाला असल्याचे भाष्य बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून काही दिवसांपूर्वीच करण्यात आले. तसेच विकास कामांच्या मुद्यावरुन देखील आव्हाड आणि बाळासाहेबांची शिवसेना यात श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आव्हाड यांनी आमदार निधीतून उभारलेली एलईडी स्क्रीन तोडण्यात आल्याने त्यांनी यावरुन महापालिकेवर निशाना साधला, त्यानंतर अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्तांवर देखील निशाना साधत होता.
आता थेट शहरात सुरु असलेल्या सुशोभरणाच्या कामावरच त्यांनी मोठो आक्षेप नोंदविला आहे. शहरात सुरु असलेल्या सुशोभीकरणाच्या आणि रस्त्यांच्या कामांसाठी राज्य शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. त्यानुसार शहरात ही कामे सुरु आहेत. परंतु असे असतांनाच रंगरंगोटीच्या कामावरुन आव्हाड यांनी ट्विट करुन महापालिकेला पुन्हा रडारवर आणले आहे.
काय आहे ट्विट
सध्या ठाण्यामध्ये रंगरंगोटीचे काम जोरदार सुरु आहे. पण, मुळात टेंडरमध्ये ज्या अटी व शर्थी नमूद करण्यात आल्या आहेत; त्यामध्ये संपूर्ण भिंत खरवडून घेऊन त्याच्यावर पांढरा रंग मारु न तसेच परत एकदा रंगाचा हात मारु न मगच जी काही रंगरंगोटी करायची आहे ती करावी असे असताना, इथे मात्र तसे काहीही न करता सरळ भिंतीवर रंगकाम केले जात आहे. पावणे चारशे कोटी रु पयांचे हे टेंडर असल्याचे समजते. हे टेंडर कोणाच्या मेहरबानीवर मिळाले आणि कोण करीत आहे. त्यातही अशी थुकपट्टीची कामे का होत आहेत याकडे चे लक्ष आहे कि नाही. आतापर्यंत रंगरंगोटी झालेली सगळी कामे ही थुकपट्टीचीच आहेत. कमीत-कमीत यापुढे तरी टेंडरनुसार काम होईल हीच अपेक्षा.