ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:14 AM2021-03-13T05:14:29+5:302021-03-13T05:14:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठामपा हद्दीत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने आता ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे ...

Another wave of corona in Thane | ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट

ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठामपा हद्दीत काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण आढळत असल्याने आता ठाण्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार, त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या हालचाली मनपाने सुरू केल्या आहेत. रुग्णवाहिकांची संख्या वाढवणे, ताप सर्वेक्षणासाठी २५ खाजगी डॉक्टरांची नेमणूक करणे, बोरिवडे येथील काेरोना रुग्णालय सुरू करणे, अशी काही महत्त्वाची कामे मनपाने हाती घेतली आहेत. या सर्वच कामांचे प्रस्ताव १९ मार्चच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवले आहे.

ठामपा हद्दीत कोरोनाची दुसरी लाट येणार नाही, असा दावा मनपाकडून केला जात होता. परंतु, आता मनपाने शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे सांगितले आहे. मागील काही दिवसांत शहरात कोरोनाचे दररोज १५० ते २५० रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मनपा दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. रुग्णवाहिकांच्या सेवेसाठी दरपत्रक तयार केले आहे. त्यानुसार, कार्डिॲक रुग्णवाहिकेच्या १५ किमी सेवेसाठी मनपा सात हजार रुपये, त्यापुढे १६ ते २० किमीसाठी साडेआठ हजार, २१ ते २५ किमीसाठी साडेअकरा हजार आणि २६ ते ३० किमीसाठी साडेबारा हजार रुपये खर्च मनपा देणार आहे. आयुक्तांनी त्यासाठी पाच लाखांच्या खर्चास मान्यता दिली आहे. तर, मोठ्या साध्या रुग्णवाहिकेच्या १० किमीपर्यंतच्या सेवेसाठी ७०० रुपये, ११ ते २० किमीसाठी १,३०० रुपये, २१ ते ३० किमीसाठी १,७०० रुपये आणि ३० किमीपेक्षा जास्त अंतरासाठी २५ रुपये प्रतिकिमी दराने आणि प्रतीक्षा कालावधीसाठी ७५ रुपये प्रतितास, असे पैसे मनपा देणार आहे. या कामासाठी २५ लाखांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे.

गेल्यावर्षी शहरातील कोरोनाचे संशयित रुग्ण शोधण्यासाठी तापतपासणी मोहीम मनपाने हाती घेतली होती. त्याकरिता ३५ खासगी डॉक्टरांची मदत घेतली होती. रुग्ण घटताच केवळ सात डॉक्टर कार्यरत होते. परंतु, आता पुन्हा २५ खाजगी डॉक्टरांच्या मदतीने मनपा तापतपासणी मोहीम राबवणार आहे. त्यासाठी प्रतिमाह एका डॉक्टरला ६० हजारांप्रमाणे वेतन देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रतिमाह १५ लाखांचा खर्च येणार आहे. तीन महिन्यांसाठी या डॉक्टरांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे ४५ लाखांच्या खर्चाचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

---------------

बोरिवडे येथील रुग्णालय करणार सुरू

- घोडबंदर येथील बोरिवडे भागात एका संस्थेच्या मदतीने ठामपाने कोरोना रुग्णालय उभारले होते. मात्र, रुग्ण घटल्यामुळे ते सुरू झालेले नव्हते. मात्र, आता ते सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

- टाटा आमंत्र येथील प्रस्तावित विलगीकरण कक्षात पाणीपुरवठ्यासाठी जलवाहिनी टाकणे, पाण्याच्या टाक्या साफ करणे, पंप व मीटर दुरुस्ती आणि इतर कामे करणे, असा प्रस्तावही महासभेपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे.

----------------

परिचारिका, आयांना मुदतवाढ

ठामपाची कोरोना केंद्रे, आरोग्य केंद्रे आणि रुग्णालये येथे ४४ परिचारिका आणि १४ आया काही महिन्यांपासून कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. या सर्वांच्या कामाची मुदत ३१ मार्च २०२१ ला संपत आहे. त्यामुळे त्यांना तीन महिने किंवा कोरोना संपेपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय ठामपाने घेतला आहे. त्यासाठी ३४ कोटी ८० लाख रुपयांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.

-----------

Web Title: Another wave of corona in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.