कोणत्याही हिंसेचे उत्तर हे अहिंसाच असते, मेधा पाटकर यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 01:43 AM2019-12-24T01:43:10+5:302019-12-24T01:44:20+5:30

सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे मत : डोंबिवलीत रंगला हेल्पिंग हॅण्ड्स वेल्फेअर सोसायटीचा नवरत्न सन्मान सोहळा

The answer to any violence is non-violence | कोणत्याही हिंसेचे उत्तर हे अहिंसाच असते, मेधा पाटकर यांचे मत

कोणत्याही हिंसेचे उत्तर हे अहिंसाच असते, मेधा पाटकर यांचे मत

Next

डोंबिवली : धर्माच्या नावाने झालेली हिंसा असो किंवा स्त्रीवर होणारे अत्याचार असू द्या, तसेच दलितांबाबत होणारी हिंसा असू द्या. हिंसा कोणतीही असू द्या, ती नाकारली पाहिजे. फाशीची शिक्षा १४६ देशांनी पाशवीवृत्ती म्हणून नाकारली आहे, तर त्यात भारत मागे का? याचा विचार केला पाहिजे. आजपर्यंत अनेकांना फाशीची शिक्षा दिली आहे, पण तरीही हिंसा थांबली नाही. याउलट, हिंसा वाढतच आहे. हिंसेला हिंसा हे उत्तर होऊ शकत नाही. हिंसेचे उत्तर अहिंसाच असते, असे मत सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले.

‘हेल्पिंग हॅण्ड्स वेल्फेअर सोसायटी’तर्फे नवरत्न सन्मान सोहळा आदित्य मंगल कार्यालयात रविवारी पार पडला. यावेळी पाटकर बोलत होत्या. ‘लकीर के इस तरफ ही नर्मदा बचाव’ ही फिल्म दाखविण्यात आली. ‘हेल्पिंग हॅण्ड’ संस्थेचा लोगो आता टपाल तिकिटावर वापरला जाणार आहे. तसेच संस्थेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले. त्या प्रमाणपत्राचे उद्घाटन पाटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या श्रीगौरी सावंत, अभिनेत्री प्रियंका मुणगेकर, वृत्तनिवेदिका अनुपमा खानविलकर, संस्थेच्या अध्यक्षा प्रियंका कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
हैदराबाद येथील घटनेविषयी पाटकर म्हणाल्या, ‘न्यायाच्या संकल्पनेच्या बाहेरची ही हत्या आहे. मनुष्यवध हा अपराध आहे. माझ्यासारख्या अनेक जणांना आणि १४६ देशांना आता हे पटले आहे. कोणताही मोठा गुन्हा व्यक्तीकडून घडला, तरी त्याची हत्या करू नये. कोणत्याही नशेत झालेली हिंसा ही आखणीपूर्वक केलेल्या हिंसेने कधी थांबू शकत नाही. अशा प्रकारचे एन्काउंटर होऊ शकत नाही. चार मुलांनी एवढ्या पोलिसांच्या गराड्यात बंदूक घेणे ही गोष्ट मला पटत नाही. कोर्टालाही यात काहीतरी काळे दिसत आहे. त्यात काय निघते, ते पाहू.’

श्रीगौरी म्हणाल्या, ‘मातृत्व यावर केवळ स्त्रीचा अधिकार नाही. त्यामुळे स्त्रीत्व आणि मातृत्व या दोन्ही गोष्टी एकत्र करू नका. कोणतीही स्त्री आई होऊ शकते. त्यासाठी कोणावर तरी नि:स्वार्थी प्रेम करता आले पाहिजे. गायत्री माझ्या आयुष्यात वादळासारखी आली, त्यासाठी मी कधीही चिंच किंवा आवळे कधी खाल्ले नाही. आता मीही एक आई आहे. छोट्या मुली कचराकुंडीत टाकल्या जातात. मुलींवर अत्याचार होतात, तेव्हा माझे रक्त आई म्हणून खवळून निघते. मला त्यांना कोणालाही माफ करावेसे वाटत नाही. अत्याचार कोणत्याही पद्धतीचा नसावा. त्यावेळी मला सरस्वती दिसत नाही. ‘आजीच्या घरातील मुली’ पुन्हा सेक्स वर्करमध्ये जाणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. या मुलांमुळे आज मी आजीही झाली आहे. आयुष्याचा हा टप्पाही मी आनंदाने जगत आहे. ’
खानविलकर म्हणाल्या, ‘वृत्तनिवेदक ज्या भूमिका मांडत असतो, त्या त्याच्या नसून संस्थेच्या असतात. त्यांचे विचार त्या भूमिकेपेक्षा वेगळे असू शकतात. गेल्या चार वर्षांपासून मी या संस्थेत येत आहे. ही संस्था चांगल्या पद्धतीने वाढत आहे. ही मुले भाषण देताना खूप आत्मविश्वासाने देत आहेत, हे पाहून आनंद वाटला.’
मुधोळकर म्हणाल्या, ‘नोकरी, अभिनय अशा क्षेत्रात मुशाफिरी सुरू आहे. नोकरीच्या ठिकाणी मला अ‍ॅडजस्ट करतात. मी शाळेची कामेही कधी अर्धवट सोडत नाही. सचिन पिळगावकरांच्या चित्रपटातील माझी भूमिका सर्वात जास्त गाजली. प्रेक्षक आपल्यापेक्षा त्या कॅरेकटरवर प्रेम करतात.’

सेन्सॉर बोर्डाचे काम योग्य नाही
बलात्कार हा एका व्यक्तीवर होत नाही. तो संपूर्ण कुटुंबाचा होतो. छोट्या गोष्टी विचार करण्याची प्रथा बदलू शकतात. चुकीच्या गोष्टी दाखविल्या तर त्या मुलांवर वाईट परिणाम करू शकतात. वेबसिरीज आल्या आहेत. मुलांच्या हातात मोबाइल असेल तेव्हा मला भीती वाटते. चित्रपटातून काय दाखवावे हे सेन्सॉर बोर्डाचे काम आहे, पण ते करीत नाहीत, असे श्रीगौरी सावंत म्हणाल्या.

Web Title: The answer to any violence is non-violence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.