पाकिस्तानच्या कारवायांना सडेतोड उत्तर द्या, बदलापुरातून शिवेंद्रसिंह राजेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:01 AM2019-02-19T05:01:34+5:302019-02-19T05:03:03+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे
बदलापूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा भागात जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला ही दुर्दैवी घटना असून पाकिस्तानच्या अशा छुप्या कारवायांना आता केंद्र सरकारने सडेतोड उत्तर दिले पाहिजे, असे मत आ. शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी रविवारी बदलापुरात व्यक्त केले.
सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित मराठा महोत्सवाला रविवारी बदलापुरात सुरु वात झाली. या महोत्सवाचे उद्घाटक म्हणून उपस्थित असलेल्या शिवेंद्रसिंह राजे यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. झाला प्रकार दुर्दैवी आहे. त्याचा बदला घेतलाच पाहिजे. चर्चा पुरे झाली. आता काहीतरी ठोस कारवाई करून दाखवा. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत, अशी सर्वांचीच भावना असल्याचे शिवेंद्रसिंह राजे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाला सर्वांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, कुणाचं आरक्षण काढून घ्या, कमी करून घ्या, अशी मागणी आम्ही कधीच केली नव्हती. मराठा समाजातील जे गरजू आहेत, त्यांना नक्कीच आरक्षणाची गरज आहे आणि त्यांना ते मिळाले पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मराठा समाजाने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. आज त्याच मोठ्या भावाची परिस्थिती अत्यंत दयनीय झालेली आहे. त्यामुळे सर्वांनीच या आरक्षणाला पाठिंबा दिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील महानाट्य
च्महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या इतिहासावर आधारित महानाट्य सादर करण्यात आले. भव्य रंगमंच, भव्य असा किल्ला या महानाट्यासाठी तयार करण्यात आला होता.
च् सोबत घोडे, उंट यांची रंगमंचासमोर वर्दळ, युद्धासाठी अनोखा मंच येथे उभारण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास यावेळी प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला. सोबत, संभाजी राजांचा लढा आणि त्यांचा झालेला अंतही यावेळी दाखवण्यात आला. यावेळी प्रेक्षकांनी महाराजांचा जयजयकार केला.