बदलापूर शहरातील ५०० भटक्या कुत्र्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण
By सुरेश लोखंडे | Published: October 30, 2023 05:38 PM2023-10-30T17:38:54+5:302023-10-30T17:39:09+5:30
शहरातील या भटक्या कुत्र्याचा त्रास लक्षात घेउन त्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण करण्याची गरज रोटरी क्लब ऑफ बदलापूर तर्फे हेरण्यात आली.
ठाणे : जिल्ह्याच्या अंबरनाथ तालुक्याच्या बदलापूर शहर परिसरातील ५०० हून अधिक भटक्या श्र्वानांचे म्हणजे कुत्र्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ बदलापूर तर्फे करण्यात आलेल्या या लसीकरणामध्ये हेंद्रेपाडा , शनी नगर, गणपती मंदिर, वाणी आली,गांधी चौक, शिवाजी चौक, घोरपडे चौक,मोहन हायलांड , कात्रप स्कूल, सिद्धी सिटी, खरवई, मोहन पाम, शिरगाव, भोसले नगर , डॉन बॉस्को शाळा आदी परिसरातील कुत्र्यांचा समावेश आहे.
शहरातील या भटक्या कुत्र्याचा त्रास लक्षात घेउन त्यांचे अँटी रेबिज प्रतिबंधक लसीकरण करण्याची गरज रोटरी क्लब ऑफ बदलापूर तर्फे हेरण्यात आली. त्यास अनुसरून शहरामधील विविध भागातील ५०० पेक्षा अधिक भटक्या कुत्र्यांचे लसीकरण २७ सप्टेंबर ते २५ऑक्टोबर या कालावधीत ही लसीकरण माेहीम क्लबचे प्रेसिडेंट रोटे डॉ . दिलिप चौधरी यांनी हाती घेतली. या दरम्यान प्रत्येक भागात जाऊन त्यांनी संबंधीत डाॅक्टरांच्या मदतीने हे लसीकरण पूर्ण केले आहे. याप्रसंगी क्लबचे सदस्य रोटे.प्रकाश शिंदे, रोटे.विशाल दिघे, रोटे. वसंत मोरे उपस्थित होते.
बदलापूर मध्ये भटक्या कुत्र्याचे प्रमाण खूप वाढले आहे व भटक्या श्वान चावण्याच्या खूप घटना घडत आहेत. लसीकरण केल्याने श्र्वानांमध्ये रेबीज होण्याचे प्रमाण कमी होऊन भटके श्वान चावण्याच्या घटना कमी होतील असे डॉ . दिलिप चौधरी यांनी सांगितले. या कामात श्वान प्रेमी नीरज, आशिष, श्रुती पेडणेकर, श्रुती मिश्रा, श्रुती पिल्ले, कोमल , रुबी, अभिनव, ओमकार, वाघमोडे, भार्गवी घारपुरे, चैताली, यांनी भटके श्वान पकडण्यासाठी मदत केली