परराज्यांंतील प्रवाशांच्या ॲण्टीजेन टेस्ट; तीन महिन्यांंत ६० हजार टेस्ट, अवघ्या ९४१ प्रवाशांना लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 07:22 AM2020-11-03T07:22:09+5:302020-11-03T07:22:32+5:30
CoronaVirus News in Thane : ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते.
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने परराज्यांतून येणाऱ्या प्रवाशांच्या ॲण्टीजेन टेस्ट ठाणे रेल्वेस्थानकाबाहेर ऑगस्ट महिन्यापासून करण्यास सुरुवात केली. तीन महिन्यांत ६० हजार प्रवाशांच्या टेस्ट करण्यात आल्या असून त्यापैकी ९४१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या प्रवाशांवर तत्काळ उपचार केल्याने धोका टाळण्यास मदत झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
ठाणे शहरात मार्चअखेरीस कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान प्रतिदिन ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, महापालिका प्रशासनाने विविध उपाययोजना केल्याने हळूहळू शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला. अशातच शासनाने वाहतुकीला परवानगी दिल्यानंतर परराज्यांतील नागरिक पुन्हा मुंबई, ठाण्यात येण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला या नागरिकांची चाचणी करण्यात येत नव्हती. त्यामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत, ठाणे महापालिका प्रशासनाकडून परराज्यांतून येणाऱ्या नागरिकांच्या ॲण्टीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, ऑगस्ट महिन्यापासून या टेस्टला सुरुवात करण्यात आली. यासाठी ३५ जणांचे पथक कार्यरत आहे. यावेळी परराज्यांतून येणाऱ्या प्रतिदिन सुमारे ८०० ते ९०० जणांची टेस्ट करण्यात येत आहे. त्यानुसार, मागील तीन महिन्यांत ६० हजार ३५३ टेस्ट करण्यात आल्या. बाधित रुग्णांवर शहरातील विविध शासकीय खासगी रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत.
केडीएमसीची रुग्णसंख्या दोन आकड्यांत
कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी प्रथमच दोन आकड्यांत म्हणजे ८८ एवढी आली. एकूण रुग्णांची संख्या ५० हजार २८२ वर पोहोचली आहे. २४ तासांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण एक हजार आठ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या एक हजार ५२७ रुग्ण उपचार घेत आहेत.