समाधानकारक पाऊस नसल्याने चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 01:10 AM2020-07-29T01:10:58+5:302020-07-29T01:11:17+5:30
धरणांतील पाणीसाठा होतोय कमी : मंगळवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी; ठाणे शहरात सखल भागांत साचले पाणी
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जुलै संपत आला तरी ठाणे जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. मुंबईसह ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही अद्याप पुरेसा पाऊस न झाल्याने धरणांतील पाणीसाठा कमी होऊ लागला असून जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे. हवामान खात्याच्या इशाºयानंतर मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. यामुळे ठाणे शहरांत घोडबंदर रोडसह सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचले होते. यामुळे वाहनचालकांचे हाल झाले.
ठाणे शहर व तालुक्यात गेल्या २४ तासांत २८ मिमी. पाऊस पडला. या दरम्यान एक झाड पडण्याच्या घटनेसह एक झाड धोकादायक स्थितीत आहे. तर एका ठिकाणी पाण्याची पाइपलाइन लिकेज झाल्याची घटना घडली. तर अन्य आठ किरकोळ घटना घडल्या. जिल्ह्यात ९६.५० मिमी. पाऊस गेल्या २४ तासांत पडला. ठाणेनंतर भिवंडीत सर्वाधिक २२ मिमी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सरासरी १३.७९ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. यात ठाणे शहरात रात्री पाचपाखाडीत सोसायटीवर झाड पडले. यामुळे येथील रस्ता काही काळ बंद करावा लागला होता. यात झाडामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, घरांचे व दोन दुकानांचे नुकसान झाले. या झाडांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नौपाडा पोलिसांसह ठाणे मनपाच्या आपत्ती नियंत्रण व व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, कर्मचारी, तर अग्निशमन दलाचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. या झाडांमुळे हा रस्ता काही काळ बंद होता. या दरम्यान पावसाची रिपरिप सुरू झाल्याने झाड हटवण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता.
या दरम्यान शहरात मानपाडा पोलीस स्टेशनच्या परिसरात पावसाचे पाणी साचल्याची घटना घडली. तर, वसंत विहारजवळील आनंद दिघे जिद्द शाळेजवळील एक झाड पडले. वर्तकनगरला झाडाच्या फांद्या पडल्या. याप्रमाणेच जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी या शहरी भागासह ग्रामीण भागातही पावसाचे आगमन झाले.
धरणांना पावसाची प्रतीक्षा
च्ठाणे जिल्ह्यातील धरणांना अद्याप पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमध्ये दुप्पट पाऊस आजपर्यंत कमी पडला आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा वाढण्याची चिंता लागून आहे.
च्आॅगस्ट आणि सप्टेंबर या उरलेल्या दोन महिन्यांत पुरेसा पाऊस न झाल्यास उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा बसण्याची भीती व्यक्त होत आहे.