कोणीही असा, शस्त्र बाहेर ठेवूनच पोलिस ठाण्यात मिळणार प्रवेश
By जितेंद्र कालेकर | Published: February 7, 2024 10:03 AM2024-02-07T10:03:30+5:302024-02-07T10:03:44+5:30
गोळीबारानंतर पोलिसांचा सावध पवित्रा
जितेंद्र कालेकर
ठाणे : लोकमत न्यूज नेटवर्क पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांच्या केबिनमध्ये लोकप्रतिनिधींसह सामान्य नागरिकांना कोणतेही शस्त्र बाळगून प्रवेश न देण्याबाबत खबरदारी घेण्याचे आदेश ठाणे पोलिसांनी दिले आहेत. वाद सुरू असलेले दोन गट एकाच वेळी पोलिस ठाण्यात येतात. त्यावेळी तर कुणी शस्त्रासोबत पोलिस ठाण्यात प्रवेश करीत नाही ना, याची विशेष खबरदारी घेतली जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने 'लोकमत'ला दिली.
उल्हासनगरातील हिल लाइन पोलिस ठाण्यात भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केल्याने ठाणे पोलिस यंत्रणाही अधिक सतर्क झाली. आमदार गायकवाड यांनी थेट पोलिस ठाण्यातच गोळीबार केल्याने ठाण्याची पोलिस यंत्रणा आणि राज्य राजकारण ढवळून निघाले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वरीलप्रमाणे आदेश देण्यात आले आहेत. पोलिस निरीक्षकांच्या गोळीबाराच्या समाजमाध्यमांसह केबिनमध्येच घटनेमुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. पोलिस ठाण्यातच एखादा राजकीय नेता सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य नागरिकांनी पोलिस ठाण्यात जाण्यात काय अर्थ आहे? अशा भावना समाजमाध्यमांमधून व्यक्त होत आहे. अनेक वेळा पोलिस ठाण्यात नेते आणि लोकप्रतिनिधी, तसेच त्यांचे समर्थक व इतर प्रतिष्ठित नागरिक थेट प्रवेश करतात. अनेक वेळा त्यांच्याकडे परवाना असलेले पिस्तूलही असते. खबरदारी घेण्याच्या दृष्टीने पोलिसांनीच अशा शस्त्रधारींना प्रवेश देण्यास अटकाव करण्याची कसोशीने अंमलबजावणी करावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले.