सत्तेत कुणीही येवोत, खाबूगिरी थांबणार आहे का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 12:37 AM2019-04-08T00:37:41+5:302019-04-08T00:37:53+5:30
२५ मिनिटांचा प्रवास । मध्य मार्गावरून प्रवास करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीने जाणून घेतले जनतेचे ‘मत’
- प्रशांत माने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना, अंबरनाथ ते डोंबिवली रेल्वेस्थानकांतून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या काही बोलक्या प्रतिक्रिया ‘लोकमत आॅन द व्हील्स’ या उपक्रमांतर्गत ऐकायला मिळाल्या. सुरक्षा, व्यापार, पायाभूत-मूलभूत सुविधा व भ्रष्टाचार यासह विविध विषयांवर प्रवाशांनी दिलखुलास मते मांडली. यातून साधारणत: जनतेचा कल हा सक्षम पर्यायाकडे असल्याचे दिसून आले.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचा भाग असलेल्या अंबरनाथ ते डोंबिवली या साधारण २० ते २५ मिनिटांच्या प्रवासात लोकसभा निवडणुकीबाबत नागरिकांच्या मनात काय आहे, हे जाणून घेतले असता, काहींनी उघडपणे तर काहींनी ‘आॅफ द रेकॉर्ड’ बिनधास्त मते मांडली. एकीकडे विरोधी पक्षांकडून मोदींविरोधात जोरदार प्रचार सुरू असताना, काँग्रेसला ६० वर्षे सत्ता दिली; मग पुन्हा एकदा मोदींना संधी द्यायला काय हरकत आहे, असा एक मतप्रवाह प्रवासादरम्यान दिसून आला. दुसरीकडे, सत्तेवर कोणीही आले, तरी ते खिसे भरणारेच असणार, अशी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर भाष्य करणारी बोलकी प्रतिक्रियाही ऐकायला मिळाली. यंदाच्या निवडणुकीत मोदी यांच्याकडे पाहूनच मते दिली जातील. सक्षम पर्याय तेच आहेत. मोदी सरकार येण्याआधी बेरोजगारी नव्हती का? आता सर्वत्र आॅनलाइनचा गाजावाजा आहे. त्यामुळे त्यानुसार अपडेट राहायलाच हवे. जे राहत नाहीत, त्यांना फटका बसतो, अशी प्रतिक्रिया सुमित बालवानी याने दिली.
जीएसटी लागू झाल्याने छोटे उद्योगधंदे बंद पडले आहेत. त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. उपासमारीची वेळ आली आहे. स्वत:चा उद्योग सुरू करायलाही भांडवल राहिलेले नाही, याकडे अंबरनाथचे रहिवासी सैफ अली शेख यांनी लक्ष वेधले. जो येतो, तो केवळ आश्वासनेच देतो; पण त्यांची पूर्तता होताना दिसत नाही. तरुणांना नोकऱ्या नाहीत. सक्षम नेता असणे गरजेचे आहे. भूलथापा नकोत. जो काम करेल, त्याच उमेदवाराच्या पाठीशी मतदार उभे राहतील. पक्ष कोणता, हे पाहिले जाणार नाही, असे मत प्रकाश बागले यांनी व्यक्त केले. कल्याण स्थानकात लोकल बराच वेळ थांबते. त्यामुळे नियोजन बिघडते, असा स्थानिक मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. पोपट बनकर या ज्येष्ठ नागरिकाने लोकलमधील वाढत्या गर्दीकडे लक्ष वेधले. प्रवाशांना चांगली सेवा मिळणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे ६० वर्षांवरील व्यक्तींनाही ज्येष्ठांसाठी राखीव असलेल्या डब्यातून प्रवास करता यावा, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. त्यासाठी सध्याची ६५ वर्षांची मर्यादा ६० वर आणावी, असाही मुद्दा त्यांनी मांडला. वाढलेल्या बेरोजगारीकडे लक्ष वेधताना नागरिकांचे स्थानिक प्रश्नही आहेत. त्याबाबतही निवडून येणाºया राजकीय पक्षाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. बाहेरचे लोंढे वाढत आहेत.
या निवडणुकीत उमेदवाराला पाहून मते दिली जातील, तर सक्षम नेतृत्व म्हणून मोदींनाच पसंती असल्याचे मत आशीष आणि श्वेता नंदनवार या जोडप्याने मांडले. सध्या जो काही प्रचार सुरू आहे, त्यात केवळ आरोप-प्रत्यारोप आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या भाषणातील त्याचत्याच मुद्द्यांनी अक्षरश: कंटाळा आला असून, यात स्थानिक मुद्द्यांना बगल दिली जात आहे. लोकलच्या फेºया वाढल्या पाहिजेत. त्यात लेडिज स्पेशल वाढवल्या पाहिजे. प्रवास सुखकर आणि सुरक्षित झाला पाहिजे, अशी मते काही महिला प्रवाशांनी व्यक्त केली.