वाहतूकीचे नियोजन केल्याखेरीज ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ नकोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 05:51 PM2018-05-30T17:51:26+5:302018-05-30T17:57:07+5:30
वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.
डोंबिवली: वाहतूकीचे नियोजन आणि पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय ठाकुर्ली उड्डाणपूलाचा शुभारंभ करण्यात येऊ नये असे पत्र फ प्रभाग समिती सभापती साई शेलार यांनी कल्याण-डोंबिवली आयुक्त गोविंद बोडके यांना दिले आहे. तीच रीओढत स्थानिक नगरसेविका खुशबु चौधरी यांनीही विरोध दर्शवला आहे.
पश्चिमेपेक्षाही तुलनेने पूर्वेला जेथे हा ब्रीज उतरतो त्या ठिकाणी जोशी हायस्कूल नजीक वाहतूक कोंडी होणार असल्याने आधी त्याचे नियोजन कसे असेल याची माहिती द्या. तसेच ठाकुर्ली उड्डाणपूलावरुन अवजड वाहने येणार नाहीत. त्यात प्रामुख्याने रेतीचे डम्पर, गॅस सिलेंडर वाहक ट्रक यांसह अन्य अवजड वाहनांची ये-जा नसावी अशीही भूमिका खुशबू चौधरी यांनी घेतली. जो पर्यंत उड्डाणपूल सुरु झाल्यास नियोजन काय असेल हे स्पष्ट केले जात नाही तोपर्यंत त्याचा शुभारंभ होऊ नये असे त्या म्हणाल्या. या मार्गावरुन स्कूल बसेसचीही ये-जा नको असेही त्या म्हणाल्या.
साई शेलार यांनी दिलेल्या पत्रामध्ये म्हंटले आहे की, उड्डाणपूलाच्या शुभारांनंतर ठाकुर्ली चोळे गावात आधीच अरुंद रस्त्यामुळे होणा-या वाहतूक कोंडीत भर पडणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनासोबत महापालिकेने चर्चा करावी, आणि बाराबंगला ते शेलार चौक हा मार्ग सुरु करावा. जेणेकरुन कोंडी फुटण्यास मदत मिळेल. त्यासाठी पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय पूल सुरु करणे म्हणजे ठाकुर्लीवासियांचे स्वास्थ हिरावून घेण्यासारखे होईल. आधीच पादचा-यांना चालतांना अनेक अडथळे येतात, त्यात हा पूल सुरु झाल्यावर हजारोंनी दुचाकी, चारचाकी, रिक्षा, टेम्पो आदींसह अन्य वाहनांमध्ये वाढ होणार आहे. त्याचे नेमके नियोजन करण्यात यावे आणि मगच पूलाचा शुभारंभ करण्यात यावा असे ते म्हणाले. या आधीच याच कारणांवरुन माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनीही या उड्डाणपूलास विरोध दर्शवल्याचे सर्वश्रुत आहे. महापालिकेच्या अभियंत्यांसह ज्या लोकप्रतिनिधींनी यासाठी पाठपुरावा केला, घाईत भूमीपूनन केले त्या सगळयांनी भविष्यात उद्भवणा-या समस्यांबद्दल काहीच विचार का केला नाही अशी टिका स्थानिकांमधून होत आहे.