सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबत अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 02:00 AM2020-08-17T02:00:34+5:302020-08-17T02:00:38+5:30
बँका, एटीएम, सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये आता सॅनिटायझरचा वापर तेवढा काळजीपूर्वक केला जात नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, सुरुवातीच्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी उपाययोजना करण्यात आल्या. सॅनिटायझरचा अधिकाधिक वापर केला जात होता. मात्र, आता याकडे तितकेसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बँका, एटीएम, सार्वजनिक स्वच्छतागृहांमध्ये आता सॅनिटायझरचा वापर तेवढा काळजीपूर्वक केला जात नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने घेतलेला आढावा...
प्रशांत माने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना रुग्णांच्या संख्येत रोज चढउतार होत असला, तरी येथील झोपडपट्ट्यांच्या परिसरात कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात प्रशासनाला यश आले आहे. मात्र, तेथील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेची जबाबदारी रहिवाशांवरच अवलंबून आहे. रेल्वेस्थानक परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या देखभालीचे कामही खाजगी संस्थांच्या माध्यमातून सुरू आहे. स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जात असली, तरी बहुतांश ठिकाणी सॅनिटायझरसारख्या सुविधांचा मात्र अभाव आहे.
केडीएमसी परिक्षेत्रात ७४ झोपडपट्ट्या आहेत. बहुतांश झोपडपट्ट्यांमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्मल ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत केडीएमसीने सार्वजनिक स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेकडे फारसे लक्ष दिले जात नसल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. खाजगी व्यक्ती नेमून अथवा खाजगी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेचा भार उचलला जात आहे. कोरोनाचा संसर्ग फैलावू नये, यासाठी प्रारंभीच्या काळात झोपडपट्ट्यांमधील स्वच्छतागृहांमध्ये केडीएमसीकडून निर्जंतुकीकरणावर भर देण्यात आला होता. मात्र, आता तसे चित्र नाही. नियमितपणे स्वच्छताही राखली जात नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
कल्याण पूर्वेतील नेतिवली, हनुमाननगर तसेच डोंबिवली रेल्वेस्थानक परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची पाहणी केली असता, त्याठिकाणी खाजगी व्यक्ती आणि संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता होत असल्याचे दिसून आले. परंतु, सॅनिटायझरसारखी सुविधा तेथील काही स्वच्छतागृहांमध्ये दिसून आली नाही. यासंदर्भात केडीएमसीचे सहायक सार्वजनिक आरोग्य अधिकारी अगुस्तीन घुटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झोपडपट्ट्यांच्या परिसरातील स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी खाजगी संस्था नेमण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणी आमच्याकडून नियमितपणे स्वच्छता केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.
...आता गांभीर्य राहिले नाही
कोरोनाची ज्यावेळी सुरुवात झाली, त्यावेळी विशेषकरून जनसंपर्क येणाऱ्या बँका आणि एटीएम सेंटरमध्ये विशेष काळजी घेतली जायची. परंतु, आता केवळ बँकांमध्येच हे चित्र दिसत आहे. त्याला लागून असलेल्या एटीएम सेंटरमध्ये मात्र सॅनिटायझरची कमतरता दिसून आली. त्यामुळे एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आणि भरण्यासाठी आलेले ग्राहक स्वत:कडील सॅनिटायझर वापरून यंत्रणा हाताळतात. विशेष करून ज्याठिकाणी गर्दी आहे, अशा रेल्वेस्थानक परिसरातील एटीएममध्ये ही परिस्थिती आहे. एटीएम सेंटरबाहेरील सुरक्षारक्षकाकडे सॅनिटायझरबाबत विचारणा केल्यावरच दिले जाते, असे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोनाचे गांभीर्य राहिले नाही का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.