एपीएमसी बरखास्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 01:04 AM2018-06-01T01:04:02+5:302018-06-01T01:04:02+5:30
कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दणका देत बाजार समिती बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला आहे
कल्याण : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच भाजपा आमदार किसन कथोरे यांनी शिवसेना-राष्ट्रवादीला दणका देत बाजार समिती बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला आहे. त्यांनी गुरुवारी पदभारही स्वीकारला. या राजकीय खेळीमुळे सभापतीपदाची निवडणूक रद्द झाली आणि त्या पदासाठी शह देणाऱ्यांना काटशह देण्यात आला.
बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणल्याने त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतरही संचालक मंडळ सदस्यांनी घोडविंदे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणला. घोडविंदे हे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या विश्वासातील असल्याने त्यांनाच शह देण्याचा प्रयत्न झाल्याने त्यांनी वेगाने राजकीय हालचाली केल्या. संचालक मंडळाने काम करू दिले नाही, असा घोडविंदे यांचा आक्षेप होता; तर संचालक मंडळाने त्यांच्याविरोधात मनमानीचा आरोप केला होता. घोडविंदे यांनी केलेली विकासकामे संचालक मंडळाला मान्य नव्हती. त्यांनी बाजार समितीचे एकही काम मार्गी लावू दिले नाही, असे मुद्देही पुढे आले आणि आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. बाजार समितीच्या संचालक मंडळात भाजपाचे नगरसेवक असलेल्या, जालिंदर पाटील यांना सोबत घेऊन शिवसेना-राष्ट्रवादीने सभापतीपदाची मोट बांधली. सभापतीपदाची निवडणूक आली की, दरवेळी संचालक मंडळावरील सदस्य हे परगावी निघून जातात. आताही सभापतीपदाची निवडणूक होणार असल्याने सेना-राष्ट्रवादीचे सदस्य केरळला गेले. तेथे फक्त घोडविंदे व दर्शना जाधव यांना नेण्यात आले नव्हते. समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीच्या आदल्या रात्री केरळला गेलेले सदस्य कल्याणमध्ये दाखल होणार होते. मात्र, बाजार समिती बरखास्त झाल्याची बातमी कळाल्याने ही मंडळी लवकर परतली.
घोडविंदे म्हणाले, सदस्यांना केवळ आर्थिक हित जोपासायचे आहे. त्यांना विकासकामे नको आहेत. त्यामुळे त्यांच्या हिताच्या बाजूने राहणे मला शक्य नव्हते. शेतकरी व व्यापारी हिताच्या बाजूने मी होतो. मी सभापती झालो त्यात कथोरे, खासदार कपिल पाटील, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार नरेंद्र पवार यांनी विश्वास दाखवला होता. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आलेली असताना कथोरे यांनी तीन वेळा मुदतवाढ घेतली होती. पण संचालक मंडळाला कामच करायचे नव्हते. हेच यातून उघड होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादीचा डाव कथोरे यांनी उलथवून लावला आहे.
समिती बरखास्त झाल्यावर तातडीने ठाण्याचे उपनिबंधक शहाजी पाटील यांची सरकारने समितीच्या प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. ठाण्याचा कारभार पाहून बाजार समितीचा कारभार पाहण्याची अतिरिक्त जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली आहे. पाटील यांनी गुरुवारी सकाळी पदभार स्वीकारला.
प्रशासक पाटील यांनी सांगितले, बाजार समितीने १४ कोटींचे कर्ज घेतले होते. त्यापैकी पाच कोटी ७५ लाखांची परतफेड केली आहे. उर्वरित सात कोटी ७५ लाख रुपये कर्जाची रक्कम फेडणे बाकी आहे. समिती कर्जाचे हप्ते वेळेवर भरू शकलेली नाही. त्यामुळे त्यांना मुदतवाढ देऊन संधी दिली. परंतु, त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे सरकारने प्रशासक म्हणून माझी नियुक्ती केली. उच्चतम दर्जाच्या कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे सहा कोटी रुपये आहे. हे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न केले जातील. उत्पन्नवाढीच्या शक्यता तपासून त्याचे नियोजन करून ते नेमके किती वाढेल, याचे लक्ष्य ठरवले जाईल. ते गाठण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत. सगळ्यांचे सहकार्य घेऊनच उत्पन्न वाढवण्याचे काम करणार असल्याचा मानस पाटील यांनी व्यक्त केला आहे.