एसटीचा ठावठिकाणा सांगणारे ॲप लॉचिंग लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:42 AM2021-08-26T04:42:34+5:302021-08-26T04:42:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना बस कुठे आली, हे मोबाइलवर कळणे सोपे जावे. यासाठी मोबाइल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांना बस कुठे आली, हे मोबाइलवर कळणे सोपे जावे. यासाठी मोबाइल ॲप विकसित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. हे ॲप १५ ऑगस्ट रोजी कार्यान्वित केले जाणार होते. मात्र, हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्याचे लॉचिंग लांबणीवर पडले आहे. त्यामुळे ते आता नक्की कधी लाँच केले जाईल, हे अद्याप स्पष्ट नसल्याने प्रवाशांना आणखीन वाट पाहावी लागणार आहे. कोरोनामुळे हे लॉचिंग लांबणीवर पडल्याचे कारण प्रशासन देत आहे.
ट्रॅकिंग सीस्टिम आहे...
कल्याण बस डेपोतून आजमितीस ७० बस चालविल्या जातात. त्यापैकी ६० बस प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेत धावत असतात. १० बस काही देखभाल-दुरुस्तीसाठी कार्यशाळेत असतात. मात्र, अशी स्थिती प्रत्येक वेळी नसते. सगळ्य़ाच बसला ट्रॅकिंग सीस्टिम लावली आहे. त्यामुळे प्रशासनाला बस कुठे आहे, याची माहिती मिळत असते. मात्र, मोबाइल ॲप कार्यान्वित नसल्याने प्रवाशांना अद्याप बस कुठे आहे, कधी येणार, हे कळत नाही. डेपो प्रशासनच तशा सूचना देत असले, तरी मात्र त्याला मर्यादा आहेत.
१५ ऑगस्टचा मुहूर्त हुकला
राज्य परिवहन महामंडळ हे ॲप १५ ऑगस्टला लाँच करणार होते. मात्र, त्याची तारीख हुकली आहे. ते अद्याप पूर्णपणे विकसित झालेच नसल्याने ते प्रवाशांच्या सेवेसाठी अद्याप खुले केलेले नाही. लवकर ते खुले करण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ॲप सुरू झाल्यावर प्रवाशांचा प्रवास सुकर होण्यास मदत होणार आहे.
बस कुठे हे आधीच कळणार...
बस कुठे आहे, कुठपर्यंत आली आहे, तिला स्थानकात पोहोचण्यासाठी किती वेळ लागेल, हे मोबाइल ॲपमुळे प्रवाशांना घरबसल्या कळणार होते. त्यामुळे स्थानकात आधीच जाऊन बसची प्रतीक्षा करणे संपणार आहे. मात्र, मुहूर्त लांबणीवर गेल्याने त्यांच्या नशिबी अद्याप प्रतीक्षाच आहे.
धोरणात्मक निर्णय...
कल्याण बस डेपोच्या सगळ्य़ाच बसना ट्रॅकिंग सीस्टिम लावली आहे. त्यामुळे बस ब्रेकडाऊन झाली, कुठे उभी आहे, तिला डेपोत येण्यासाठी किती वेळ लागेल हे कळते. मात्र, मोबाइल ॲप अद्याप कार्यान्वित झालेले नाही. कोरोनामुळे हे काम लांबणीवर पडले असण्याची शक्यता आहे. लाँचिंग करणे हा महामंडळाचा धोरणात्मक निर्णय आहे.
-विजय गायकवाड, डेपो व्यवस्थापक, कल्याण.
------------------------------------