जप्त केलेली वाहने घेऊन जाण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:39 AM2021-03-19T04:39:33+5:302021-03-19T04:39:33+5:30
भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ...
भिवंडी : भिवंडी शहर वाहतूक विभागाने २०१६ ते २०२० या कालावधीत केलेल्या विशेष कारवाई दरम्यान एकूण १४४ रिक्षा व ६० दुचाकी अशी २०४ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत. त्यापैकी २५ दुचाकी व ५३ रिक्षा या बेवारस असून, ३५ दुचाकी व ९१ रिक्षांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
ही सर्व वाहने भोईवाडा पोलीस ठाणे हद्दीतील कारीवली गाव येथील सरकारी जागेत ठेवण्यात आली होती; परंतु वाहने पावसात भिजून खराब झाली असून, त्यातून दुर्गंधी येत असल्याने त्याबाबत परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी आदेश दिले आहेत. या वाहनांपैकी वाहतूक उपविभाग येथे उपलब्ध असलेल्या वाहनांपैकी १२९ रिक्षांचे मालक व ४१ दुचाकीच्या मालकांची माहिती आर.टी.ओ. ठाणे कार्यालयाकडून प्राप्त करण्यात आली असून, या वाहन मालकांच्या निवासस्थानाचे पत्ते शोधून त्या ठिकाणावर वाहनमालकांना नोटीस पाठविण्यात आल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.
दरम्यान, जप्त व बेवारस रिक्षा व दुचाकी आपल्या मालकीच्या असल्यास, त्यांची चोरी झाली असल्यास किंवा त्या हरविल्या असल्यास वाहनांच्या मालकी हक्काची आवश्यक ती कागदपत्र घेऊन वाहतूक उपविभाग, भिवंडी या कार्यालयात येऊन संपर्क साधावा, अन्यथा ही जप्त व बेवारस वाहनांच्या मालकी हक्काबाबत कोणीही पुढे आले नाही तर वरील सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांनी दिली असून, तशा आवाहनाचे प्रसिद्धिपत्रकही काढले आहे.