ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभेच्या उमेदवारी अर्जास मंगळवारपासून प्रारंभ; आयुक्तांकडून कामाचा आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 07:32 PM2019-04-01T19:32:15+5:302019-04-01T19:39:25+5:30
लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. या कालावधीत येणारे सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. पाटील यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले
ठाणे : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार आहे. यासाठी तिन्ही मतदार संघांच्या निवडणूक अधीसूचनाही जाहीर होत आहे. यास अनुसरून कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटीलय यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक यंत्रणेला सखोल मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक प्रक्रिया पार पाडतांना या प्रक्रियेतील प्रत्येक घटकाने आपापल्या कामाचे सूक्ष्म नियोजन करणे अपेक्षित आहे. या कालावधीत येणारे सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही, याकडे लक्ष केंद्रीत करून आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश डॉ. पाटील यांनी जिल्हा निवडणूक यंत्रणेला दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कामकजाचा आढावा डॉ. पाटील यांनी आज घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी नार्वेकर, यांच्यासह ठाणे लोकसभा मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, भिवंडीचे किशन जावळे, कल्याणचे शिवाजी कादबाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, निवडणूक उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी तसेच सर्व नोडल अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील निवडणूक कामकाजाचा आढावा सादर केल्यानंतर डॉ. पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करून आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश जारी केले. जिल्ह्यात दिव्यांग मतदारांना निवडणुका सुलभ व्हाव्यात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीन देखील त्यांनी उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच आगामी काळात सण, उत्सव आदी साजरे होतांना आचारसंहिता भंग होणार नाही याकडे काटेकोर लक्ष असू द्यावे, अशा सुचना ही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. याशिवाय मतदार सहायता केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधांची उपलब्धता करण्यावर निवडणूक यंत्रणेने काळजी घेण्याचे निर्देशही डॉ. पाटील यांनी यावेळी दिले.