आरटीईच्या १२ हजार शालेय जागांसाठी २७ हजार ३५३ हजार बालकांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:20 AM2021-04-08T00:20:27+5:302021-04-08T00:20:43+5:30
२५ टक्के प्रवेश राखीव : जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश
- सुरेश लोखंडे
ठाणे : जिल्ह्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय आदी परिवारातील बालकांना उत्तम दर्जाचे शिक्षण देणाऱ्या त्यांच्या घराजवळील शाळेत २५ टक्के प्रवेश राखून ठेवले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील ६७७ शाळांचा समावेश आहे. त्यातील १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी २७ हजार ३५३ बालकांनी ऑनलाइन अर्ज केले आहेत.
शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखाली बालकांना त्यांच्या जवळच्या शाळेत शिकण्याचा हक्क मिळाला आहे. मात्र, शाळांकडून विविध शुल्काच्या माध्यमातून मोठमोठ्या रकमांची मागणी केली जाते. त्यास आर्थिकदृष्ट्या सक्षम पालकांकडून पाठिंबा दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या मुलांना प्राधान्याने या शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. त्यास आळा घालण्यासाठी या गरिबांच्या बालकांसाठी या मनमानी करणाऱ्या शाळांमध्ये आता एकूण प्रवेशाच्या २५ टक्के शालेय प्रवेश सक्तीने राखीव ठेवले जात आहेत. यानुसार जिल्ह्यातील ६७७ शाळांमध्ये पहिलीच्या वर्गासाठी ११ हजार ११४ व पूर्व प्राथमिकसाठी ९६० बालकांचे शालेय प्रवेश राखीव ठेवले आहेत.
या १२ हजार ७४ शालेय प्रवेशासाठी यंदा पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. यासाठी तब्बल २७ हजार ३५३ अर्जांची ऑनलाइन नोंदणी पूर्ण झाली आहे. उर्वरित आठ हजार २७६ बालकांची नोंदणी अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. या प्राप्त अर्जांतून सद्य:स्थितीपर्यंत १९ हजार ७७ हजार अर्ज मान्य झाले आहेत. अपूर्ण अर्जांच्या पूर्ण नोंदणीसाठी प्रशासनाने जोरदार प्रयत्न करून ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण केली आहे. या प्राप्त अर्जांतून लॉटरी सोडतीद्वारे बालकांचे प्रवेश संबंधित शाळेत करण्यात येणार आहेत. याद्वारे मिळणारे शालेय प्रवेश २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी राहणार आहेत.
तालुका शाळा
अंबरनाथ - २६७५
भिवंडी मनपा - २२७३
भिवंडी ग्रा. - ८६१
कल्याण ग्रा. - २२९९
कल्याण डोंबिवली - २७७९
मीरा भाईंदर - ३९५
मुरबाड- १०१
नवी मुंबई- ६४१०
शहापूर- ६५०
ठाणे मनपा १ - १४४७
ठाणे मनपा २ - ३५५०
उल्हासनगर- ९७७