हवेची गुणवत्ता मोजणारे सयंत्र कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 12:24 AM2018-11-01T00:24:39+5:302018-11-01T00:24:59+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाचा उपक्रम; दररोज मिळणार हवेच्या स्थितीचे निष्कर्ष
कल्याण : कल्याण पश्चिमेतील वाणी विद्यालयाच्या परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाने हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारे सयंत्र कार्यान्वित केले आहे. या यंत्राद्वारे हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप होणार आहे. त्यात काही प्रदूषण आढळून आल्यास त्यानुसार प्रदूषण नियंत्रणासाठी कृती आराखडा तयार करणे सोयीचे होणार आहे. या सयंत्राच्या उभारणीवर ७० लाखांचा खर्च केला आहे.
कार्यान्वित करण्यात आलेल्या सयंत्राची पाहणी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी धनंजय पाटील व उपप्रादेशिक अधिकारी अमर दुर्गुले यांनी केली. दुर्गुले यांनी सांगितले की, कल्याण परिसरातील हवेची गुणवत्ता तपासली जाणार आहे. हवेत धुलीकणांचे प्रमाण किती आहे, कार्बनडाय मोनोक्साइड, नायट्रस आॅक्साइड, ओझोन, सल्फरडाय आॅक्साइड, वाहनांतून उत्सर्जित होणारे वायू या सगळ्यांची गुणवत्ता मोजली जाईल. प्रदूषण नियंत्रणाची मानके व त्यानुसार नोंदी होत आहेत की नाही, याचा विचार केला जाणार आहे. या सगळ्यांचा तक्ता त्याठिकाणी सामान्य नागरिकांना पाहता येणार आहे. त्यात तापमान, वाऱ्याचा वेग व वातावरणातील आर्द्रता दिसून येणार आहे. त्याठिकाणी हवेच्या गुणवत्तेबाबतचा तक्ता २४ तास दिसणार आहे. तसेच हवेच्या गुणवत्तेबाबतचा हा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाइटवरही टाकला जाणार आहे. वेबसाइटवर त्याचा तपशील पाहता येणार आहे.
कल्याण रेल्वेस्थानकातील ‘ते’ यंत्र बंद
पाच वर्षांपूर्वी संकल्प प्रतिष्ठाने स्वखर्चातून कल्याण स्टेशन परिसरातील पश्चिमेला नेहरू चौकात तापमान, पाऊस आणि हवेची आर्द्रता दर्शवणारे सयंत्र बसवले होते. ते सध्या बंद आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिका स्टेशन परिसराचा विकास करणार आहे. ३७५ कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पात संकल्प प्रतिष्ठानच्या सयंत्राची जागा कुठे ठरवायची, हे निश्चित नाही.
त्यामुळे ते पुन्हा सुरू करण्यात आलेले नाही. पाच वर्षांपासून हे सयंत्र व त्याचे निष्कर्ष सांगणारा दैनंदिन तक्ता सुरू होता, अशी माहिती संकल्प प्रतिष्ठानचे प्रमुख सचिन कदम यांनी दिली.
वाहतुकीचा मार्ग बदलणार?
प्रदूषण नियंत्रण मंडळाने वाणी विद्यालयाच्या ठिकाणी बसवलेल्या सयंत्रापासून जवळ आधारवाडी डम्पिंग ग्राउंड आहे. या डम्पिंग ग्राउंडच्या दुर्गंधीचा त्रास नागरिकांना होत असतो. डम्पिंग ग्राउंडमुळे शहराच्या पश्चिम भागात हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट असते. या सयंत्रामुळे दुर्गंधीयुक्त हवेचे मोजमाप होणार आहे. त्याचबरोबर पश्चिम भागात वाहतुकीमुळे प्रदूषण होते की नाही, हे सयंत्रामुळे समजणार आहे. प्रदूषण होत असल्यास त्या भागातील वाहतूक इतर मार्गाने वळवण्याचा विचार करता येऊ शकतो.