आरटीईच्या माेफत शालेय प्रवेशासाठी नव्याने करा अर्ज; जिल्ह्यातील ६३८ शाळा पात्र
By सुरेश लोखंडे | Published: May 19, 2024 04:36 PM2024-05-19T16:36:56+5:302024-05-19T16:37:25+5:30
त्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: यंदा २०२४-२५ या शालेय वर्षासाठी शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्याखालील २५ टक्के राखीव शालेय प्रवेशासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६३८ पात्र शाळा आहेत. या शाळांमधील ११ हजार ३०९ या रिक्त जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमामधील दुर्बल व वंचित घटकांतील बालकांना स्वंय अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळा, पोलीस कल्याणकारी शाळा (विनाअनुदानीत) आणि महानगरपालिका शाळा (स्वंयअर्थसहाय्यित शाळा) शाळामध्ये आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पदधतीने राबविण्यात येणार आहे. त्यासाठी या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई अंतर्गत यापूर्वी ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या बालकाच्या पालकांनी पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी ऑनलाईन पदधतीने केलेल्या अर्जाच्या सन २०२४-२५ या वर्षाच्या आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीयेसाठी विचार केला जाणार नाही याची कृपया पालकांनी नोंद घ्यावी असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) कडून करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी प्रवेश प्रकियेत आपल्या बालकांची अर्ज नोंदणी करून या सुविधेचा लाभ घ्यावा. त्यासाठी या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत बालकांच्या अर्ज नोंदणीसाठी महाराष्ट्र शासनाकडून https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rte_index_new या वेबसाईट वर पालकांसाठी मदत केंद्रांची यादी , ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शक पुस्तिका, आवश्यक कागदपत्र इत्यादीबाबत सर्व माहिती शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.