तांत्रिक अडचण आल्यास आॅफलाइन अर्ज घ्या
By admin | Published: April 29, 2017 01:31 AM2017-04-29T01:31:47+5:302017-04-29T01:31:47+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेने नवीन नळजोडणीसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा ठराव सोमवारच्या स्थायीच्या बैठकीत सादर केला होता.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने नवीन नळजोडणीसाठी आॅनलाइन अर्ज मागवण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा ठराव सोमवारच्या स्थायीच्या बैठकीत सादर केला होता. त्यावर स्थायीने आॅनलाइन प्रक्रियेला पसंती देत तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास आॅफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात यावे, अशी सूचना प्रशासनाला केली.
ज्या आस्थापना व गृहसंकुलांनी बेकायदा नळजोडण्या घेतल्या आहेत, त्यांच्यावर पालिकेने गुन्हे दाखल केले आहेत. त्यांनाही नवीन नळजोडणी मोहिमेंतर्गत सामावून घ्यावे. त्यांच्याकडून दंडात्मक शुल्क वसूल करून त्यांच्या नळजोडण्या नियमित कराव्यात. याखेरीज, त्यांच्यावर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी सूचना स्थायीने प्रशासनाला केली आहे. यावर, प्रशासन सकारात्मक असल्याचे सांगण्यात आले.
पालिकेला एमआयडीसी कोट्यातून ७५ दशलक्ष अतिरिक्त पाणीपुरवठा १५ मे पासून उपलब्ध होणार आहे. तत्पूर्वी त्यातील २५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा शहराला तातडीने सुरू करण्यासाठी जिल्हा लघुपाटबंधारे विभागाने मान्यता दिल्याने ३० एप्रिलदरम्यान हा पाणीपुरवठा मिळण्यास सुरुवात होईल. त्यामुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी पुरेसे पाणी मिळेल. ज्यांना २०११ पासून नवीन नळजोडणी मिळालेली नाही, त्यांना नवीन नळजोडणी मिळण्यास सुरुवात होणार आहे. त्यासाठी भोगवटा दाखला व मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम झाल्याची खात्री केल्यानंतरच नवीन नळजोडणीचा लाभ मिळणार आहे. ही मोहीम ३० एप्रिलपासून सुरू होणार असून त्यासाठी आॅनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. (प्रतिनिधी)