'...तर अशा चित्रपटांसाठी इतिहासतज्ञांची समिती नेमा'; प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

By अजित मांडके | Published: November 9, 2022 01:33 PM2022-11-09T13:33:58+5:302022-11-09T13:34:09+5:30

सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात, आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे चित्रपटांवर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहेत.

Appoint a committee of historians for such films; MLA Pratap Sarnaik's request to the CM Eknath Shinde | '...तर अशा चित्रपटांसाठी इतिहासतज्ञांची समिती नेमा'; प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

'...तर अशा चित्रपटांसाठी इतिहासतज्ञांची समिती नेमा'; प्रताप सरनाईकांचा मुख्यमंत्र्यांकडे आग्रह

Next

ठाणे : वारंवार ऐतिहासिक चित्रपटांवरून वादंग होत असतात, आता ही हर हर महादेव या चित्रपटावरून वाद- विवाद सुरू झाला आहे. त्यामुळे महापुरुषांच्या जीवनावर आधारीत निर्मिती होणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांवर इतिहासतज्ञांची समिती नेमावी, अशी मागणी ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच इतिहास तज्ञांच्या मान्यतेनंतरच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर लोकांसमोर योग्य इतिहास जाईल, आणि वाद-विवाद होऊन चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होणार नाही. याशिवाय नागरिकांच्या अभिव्यक्तीचे संरक्षण होईल,असे नमूद केले आहे.

सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनात, आपल्या देशातील बहुतांश नागरिक हे चित्रपटांवर आणि कलेवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक आहेत. चित्रपटांच्या माध्यमातून दाखवलेली गोष्ट त्यांच्या मनावर प्रभाव टाकून जाते. आपल्या देशातील अनेक प्रतिभावंत दिग्दर्शकांनी अत्यंत नाजूक आणि समाजाला योग्य दिशा दाखवणारे विषय चित्रपटांच्या माध्यमातून मांडले आहेत व लोकांच्या मनावर त्याचा खोलवर परिमाण पाहायला मिळाला आहे. इतिहासावर देखील हिंदी असो अथवा मराठी सिनेसृष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सुंदर अश्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनावर अथवा त्यांच्याशी संबंधित अनेक घटनांवर अप्रतिम चित्रपटांची निर्मिती आपल्या दिग्दर्शकांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, बाळ भिमराव, पावनखिंड, तान्हाजी, फर्जंद, शेर शिवराज असे अनेक सुंदर चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. असे ही त्यांनी म्हटले. तसेच त्यांनी स्वतः निर्माता, आमदार आणि चित्रपटांचा चाहता असल्यामुळे कांही गोष्टी निरीक्षणास आणून देऊ इच्छितो. ऐतिहासिक चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते अत्यंत मेहनतीने आणि स्वच्छ हेतूने बनवीत असतात. परंतू, बऱ्याच वेळी सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यावरही कांही संघटना, पुढारी यांच्याकडून आक्षेप घेतला जातो आणि चित्रपटांचे शो बंद पाडले जातात.

शो बंद पाडण्याचे त्यांचे इतिहासातले वेगळे तक्रार असतात, ते योग्य कि अयोग्य हा संशोधनाचा विषय आहे. असे त्यांनी नमूद केली. परंतु त्यामुळे निर्मात्यांचे खूप मोठे नुकसान होते, तसेच प्रेक्षकांच्या मनातही संशय निर्माण होतो. आगामी आलेले ’हर हर महादेव“ आणि ’वेडात मराठे वीर दौडले सात“ या चित्रपटांविषयी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज छत्रपती संभाजी राजे भोसले व छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. असेही त्यांनी त्या निवेदनात म्हटले आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज असोत अथवा महापुरुष असोत हा भावनिक विषय आहे. यावर तोडगा म्हणून त्यानी विनंती करत, महापुरुषांच्या जिवनावर आधारित चित्रपट बनवतांना राज्य शासनाने ’एक इतिहास तज्ञांची समिती स्थापन करावी“. अशी मागणी केली. या समितीमुळे जेणेकरून यापुढे होणारे ऐतिहासिक महापुरुषांसंदर्भातील चित्रपटांना समितीतील इतिहास तज्ञांच्या मान्यतेनंतरच चित्रपट प्रदर्शित होतील. त्यामुळे लोकांसमोर योग्य इतिहास जाईल व वाद-विवाद होऊन चित्रपट निर्मात्यांचे नुकसान होणार नाही. तरी सुध्दा कोणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास चित्रपटांना राज्य सरकारच्या माध्यमातून संरक्षण मिळेल व त्यामुळे समाजातील नागरिकांच्या अभिव्यक्तीचे संरक्षण होईल. असे सरनाईकांनी म्हटले आहे

Web Title: Appoint a committee of historians for such films; MLA Pratap Sarnaik's request to the CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.