खड्डे बुजविण्यासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा - एकनाथ शिंदे
By अजित मांडके | Published: July 16, 2022 01:40 PM2022-07-16T13:40:07+5:302022-07-16T13:40:32+5:30
वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या
ठाणे : खड्डे बुजविण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी या दोन यंत्रणांनी स्वतंत्र असे अधिकारी नियुक्त करावेत. या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील यंत्रणा चोवीस तास खड्डे बुजवण्याचे काम करेल. खड्डे दर्जेदार अशी सामुग्री वापरून रेडीमिक्स पद्धतीने भरण्यात यावेत. नियुक्त अधिकाऱ्यांची ही टीम रस्ते कोणत्या यंत्रणेचे हे न पाहता खड्डे भरेल. त्यासाठीचा खर्च संबंधित यंत्रणेकडून घेण्यात यावा. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यानी दिले आहेत.
वेळेत आणि चांगल्या पद्धतीने रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील, याची काळजी घ्या. वाहतूकीची कोंडी आणि खड्डे यातून लोकांना दिलासा देण्यासाठी काम करा. रस्ता कोणाचा आहे हे लोकांना माहित नसते. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था होऊ नये यासाठी प्रयत्न करा. खड्ड्यांबाबत वाहतूक पोलिसांना चांगली माहिती असते. त्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी पोलिसांकडून माहिती घेत राहा. पोलिसांनीही या यंत्रणाच्या संपर्कात राहून रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महामार्गांवरील वाहतुकीचे नियमन करा. विशेषतः जेएनपीटी आणि अहमदाबाकडून येणाऱ्या वाहतूकीचे नियंत्रण करा. एमएमआरडीए क्षेत्रातील महापालिकांनी त्यांचे अंतर्गत रस्तेही खड्डे मुक्त राहतील, याची काळजी घ्यावी. एकंदरच वाहतूक कोंडी दूर व्हावी यासाठी रस्ते विकास प्रकल्प – रोड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबविण्यात यावा. त्यासाठी दीर्घकालीन असे नियोजन करण्यात यावे. यासाठी एमएमआरडीएने पुढाकार घ्यावा. बायपास, फ्लायओव्हर, अंडरपास, सर्व्हिस रोड अशा सर्व प्रकारचे नियोजनासाठी तज्ज्ञांकडून आराखडा तयार करून घेण्यात यावा. यासाठी आवश्यक तिथे भूसंपादन आणि स्थानिक मुद्दे विचारात घेऊन जिल्हाधिकारी, संबंधित महापालिका आयुक्तांनीही सहकार्य करावे. एकूणच एमएमआर क्षेत्रातील मुंबई शहरासह, ठाणे, नवी मुंबई तसेच शीळ फाटा, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी अशाच सर्वच परिसरातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायमस्वरुपी अशा उपाय योजना करण्याबाबत प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.