मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागार नियुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 05:17 AM2019-09-15T05:17:45+5:302019-09-15T05:17:45+5:30

मीरा भाईंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Appoint contractors as well as consultants for metro routes | मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागार नियुक्त

मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागार नियुक्त

Next

ठाणे-भिवंडी-कल्याण, दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गांसाठी कंत्राटदार तसेच सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे नियोजित दोन मेट्रो मार्गांच्या उभारणीला वेग येणार आहे. त्याचप्रमाणे मेट्रो भवन उभारणीसाठीही सल्लागार कंपनीची नियुक्ती झाली आहे.
प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-५ एलिव्हेटेड मार्ग व स्थानकांच्या उभारणीसाठी मे. अ‍ॅफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चरची निवड करण्यात आली. धामणकर नाका, अंजूर फाटा, पूर्णा, काल्हेर, कशेळी, बाळकुम नाका व कापुरबावडी या स्थानकांची उभारणी ही कंपनी करेल. मे. सिस्ट्रा फ्रान्स, मे. कन्सल्टिंग ग्रुप लि. व मे. सिस्ट्रा एम. व्ही. कन्सल्टिंग इंडिया लि. या कंपनीची सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. कल्याण ते भिवंडी मेट्रो-५, दहिसर पूर्व ते मीरा भार्इंदर व अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मेट्रो-९ मार्गाच्या स्थापत्यकामाची जबाबदारी या कंपनीवर असेल. पूर्व - पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील पादचारी पूल, पादचारी भुयारी मार्ग तसेच वाहनांसाठीच्या भुयारी मार्गांची डागडुजी केली जाणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने २७ लाखांपेक्षा जास्त रकमेची तरतूद केली आहे.
या दोन्ही महामार्गांच्या डागडुजीचे काम मुंबई प्राधिकरणाकडे आहे. त्यात पादचारी पूल व भुयारी मार्गांचा समावेश आहे. मध्यंतरी मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेनंतर सर्वच यंत्रणांच्या अखत्यारीतील पुलांच्या डागडुजीचा, त्याचबरोबर पुनर्बांधणीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विविध यंत्रणांनी त्यांच्या हद्दीतील पुलांची कामे हाती घेतली आहेत.
पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गांवरील काही भाग प्राधिकरणाच्या हद्दीत येतो. तेवढ्या भागातील डागडुजीची कामे करणे ही प्राधिकरणाची जबाबदारी आहे. या दोन्ही महामार्गांवरील अनेक पादचारी पुलांची अवस्था वाईट झाली आहे. विक्रोळीतील कन्नमवार नगर, टागोर नगर तसेच कांजूरमार्ग येथील पादचारी पुलांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पूर्व द्रुतगती मार्गावर विक्रोळी येथे पादचाऱ्यांसाठी एक भुयारी मार्ग आहे. त्यानंतर मुलुंड-नाहुर रोड, मुलुंड म्हाडा कॉलनी येथे वाहनांसाठी भुयारी मार्ग आहे. या महामार्गांवरील डागडुजीच्या कामाकरिता प्राधिकरणाने २७ लाख ५७ हजार रुपयांची निविदा काढली आहे. हे काम वर्षभर सुरू राहणार आहे.

Web Title: Appoint contractors as well as consultants for metro routes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.