महापौर डिंपल ह्यांची एमएमआरडीच्या बैठकांच्या निमंत्रितपदी नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2018 07:28 PM2018-04-02T19:28:13+5:302018-04-02T19:28:13+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची एमएमआरडीच्या बैठकांसाठी निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे. चक्रानुक्रमानुसार मेहता यांची निवड झाली झाली असून, निमंत्रित म्हणून त्या शहराच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत.
मीरा रोड - मीरा-भार्इंदर महापालिकेच्या महापौर डिंपल मेहता यांची एमएमआरडीच्या बैठकांसाठी निमंत्रित म्हणून नियुक्ती झाली आहे. चक्रानुक्रमानुसार मेहता यांची निवड झाली झाली असून, निमंत्रित म्हणून त्या शहराच्या पहिल्या महापौर ठरल्या आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत विविध महापालिका व नगरपरिषद, ग्रामपंचायती येतात.
एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्राचा आवाका मोठा असल्याने प्राधिकरणाच्या हद्दीतील लोकप्रतिनिधींना एमएमआरडीएवर प्रतिनिधित्व देता यावे म्हणून महापालिकांचे चक्रानुक्रम पद्धतीने प्रत्येकी २ वर्षांकरिता तीन महापौर तर त्याच प्रमाणे प्रत्येकी २ वर्षांकरिता तीन नगरपरिषदांचे नगराध्यक्ष यांची निमंत्रित नियुक्ती केली जाते.
या महापौर व नगराध्यक्षांना एमएमआरडीएच्या बैठकांना पदाधिष्ठीत निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले जाते. यंदाच्या निमंत्रितांमध्ये मीरा-भार्इंदर महापालिकेचा क्रमांक लागल्याने महापौर डिंपल मेहता यांची निमंत्रित म्हणून नियुक्ती दोन वर्षांसाठी केलेली आहे. त्यामुळे येत्या २ वर्षांतील एमएमआरडीएच्या बैठकांमध्ये महापौर मेहता सहभागी होऊ शकणार असल्याचे प्राधिकरणाच्या आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे त्यांना कळवले आहे. महापौरांच्या नियुक्तीमुळे शहरातील प्रकल्प मार्गी लागण्यास तसेच नवीन विकासकामांना मंजुरी मिळण्यासाठी त्या आग्रही भूमिका बजावतील, अशी आशा आहे.