आचारसंहिता पालनासाठी ठाणे जिल्ह्यात ७७ भरारी पथकांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 09:28 PM2019-09-25T21:28:12+5:302019-09-25T21:46:29+5:30
मुसळधार पावसामुळे ज्याठिकाणी मतदारांची कागदपत्रे गहाळ झाली असतील, अशा भागातील नागरिकांना १३ पैकी एक पुरावा तातडीने देण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी दिली. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघात निवडणुक प्रक्रि या सुरळीतपणे राबिवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. या निवडणुकीत जास्तीतजास्त मतदारांना सहभागी होता यावे व कुणीही मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी नियोजन केल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आचारसंहितेच्या काटेकोर पालनासाठी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये ७७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच मुसळधार पावसामुळे ज्याठिकाणी मतदारांची कागदपत्रे गहाळ झाली असतील, अशा भागातील नागरिकांना १३ पैकी एक पुरावा तातडीने देण्याचे आदेश संबंधित तहसीलदारांना दिल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बुधवारी दिली. निवडणूक कामकाजाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तसेच मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध वस्तूंचा तसेच पैशांचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ७७ भरारी पथकांमार्फत विशेष करडी नजर ठेवण्यात येणार आहे. यात ठाण्यात ५०, नवी मुंबईत १९ आणि ठाणे ग्रामीण भागात आठ पथकांची नेमणूक केली आहे. तर, १०१ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. यातही ठाणे शहराच्या परिसरात १२ मोक्याच्या ठिकाणांवर, नवी मुंबईत ६३, तर ठाणे ग्रामीण भागात २६ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या आणि आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरले होते. या पुराचा सर्वाधिक फटका बदलापूर, कल्याण आणि दिवा या परिसराला बसला होता. यामध्ये अनेकांची साधनसामग्री पाण्यात वाहून गेली होती. महत्त्वाच्या कागदपत्रांसह मुलांच्या शैक्षणिक साहित्याचाही यामध्ये समावेश आहे. निवडणुकीच्या वेळी कोणत्याही पुराव्याशिवाय मतदान कसे करता येणार, हा प्रश्न ऐरणीवर होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना मतदानासाठी आवश्यक असलेल्या १३ पैकी एक पुरावा तत्काळ तयार करून देण्याच्या सूचना केल्याचे जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले. हा पुरावा ग्राह्य धरून त्यांना मतदानाचा पवित्र हक्क बजावता येणार असल्याचेही ते म्हणाले.
* मुंबईतून येणार ठाण्यासाठी मनुष्यबळ
लोकसभा निवडणुकीच्या वेळी ठाणे जिल्ह्यात निवडणूक यंत्रणेसाठी मनुष्यबळाची कमतरता भासली होती. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांसाठी मुंबई तसेच मुंबई उपनगरे येथून मनुष्यबळ मागविण्यात येणार आहे. तब्बल ५० हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात राहणार आहेत.
* चुनाव पाठशालेसह घंटागाडीद्वारेही जनजागृती
लोकसभेपेक्षा विधानसभेच्या मतदानासाठी अधिकाधिक युवा तसेच मतदारांनी मतदानासाठी येण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. १८ वर्षांवरील महाविद्यालयीन नवतरुणांनी मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी महाविद्यालयात जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. ‘चुनाव पाठशाला, सायकल रॅलीसह मॉलमध्येही फ्लॅशमॉब तसेच पथनाट्य स्पर्धेसह विविध उपक्र म राबविण्यात येणार आहे. घंटागाड्यांमध्येही आॅडिओ सीडी लावून गायनातून मतदानासाठी जनजागृती केली जाणार आहे.
.........................
खर्चावरही सहा निरीक्षकांची नजर
विधानसभा निवडणूकीत उमेदवारांकडून केल्या जाणाऱ्या खर्चाची माहिती घेण्यासाठी आयकर आणि कस्टम विभागातील अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन विधानसभा मतदारसंघासाठी एक याप्रमाणे सहा निरीक्षकांची नियुक्ती केल्याचेही नार्वेकर यांनी सांगितले.
..................................
हेल्पलाईन, मोबाइल अॅप कार्यरत
ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात निवडणुक प्रक्रि या सुरळीतपणे राबिवण्यासाठी विविध यंत्रणा कार्यान्वित केल्या आहेत. या निवडणुकीत जास्तीजास्त मतदारांना सहभागी होता यावे व कुणीही मतदाना पासून वंचित राहू नये यासाठी नियोजन केल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. जिल्ह्यात १९५० हेल्पलाईन, सी व्हीजिल मोबाइल अॅप, भरारी पथके, सीसीटीव्ही यंत्रणा अशा विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देखरेख आणि नियंत्रण ठेवले जाईल. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पोलीस यंत्रणा तसेच जिल्हा प्रशासन यांच्या समन्वयातून निर्भय आणि मुक्त वातावरणात निवडणुका होतील, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच राजकीय पक्षांनी प्लास्टिकचा वापर टाळून निवडणूक प्रचार साहित्य हे पर्यावरण पूरक असेल या दृष्टीने प्रयत्न करावा, असेही आवाहन त्यांनी केले.
..............................
* १७२९ शस्त्रपरवाने जमा
जिल्ह्यात एकूण ६ हजार १६० शस्त्रपरवाने आहेत. यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ४ हजार नवी मुंबई पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीत ९६२ आणि ठाणे ग्रामीण मध्ये ८७१ आहेत. यापैकी निवडणुकीच्या काळात एक हजार ७२९ जमा केली आहेत. त्यातील ठाणे पोलीस आयुक्तालय हद्दीत एक हजार ३९५, नवी मुंबई २२ आणि ठाणे ग्रामीण ३१२ अशी एकूण एक हजार ७२९ जमा केल्याचे त्यांनी सांगितले.
* एक खिडकी योजना
विधानसभा मतदार संघिनहाय एक खिडकी योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. यामध्ये वाहनपरवाना, प्रचार कार्यालय परवाना, सभा, रॅली, लाऊडस्पीकर आदी योजनांचा लाभ घेता येणार आहे.
...................
ओळखपत्र कॅम्पचे आयोजन
यंदाच्या पुराच्या काळात ज्या नागरिकांचे ओळखपत्र वाहून गेले असेल असा नागरिकांसाठी काही दिवसातच त्यांच्या मतदारसंघात विशेष ओळखपत्र कॅम्पचे आयोजन करण्यात येईल. त्यामुळे कोणताही मतदार मतदान प्रक्रि येपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे.
.................
* तर १५ मिनिटांमध्ये येणार मशिन
मतदानाच्या वेळी एखाद्या मतदानयंत्रात बिघाड झाला तर अवघ्या १५ मिनिटांमध्ये दुसरे यंत्र त्याठिकाणी उपलब्ध होईल, अशी यंत्रणा कार्यान्वित केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन असे ३६ मतदान केंद्र सखी महिला मतदान केंद्र म्हणून कार्यान्वित राहतील. याठिकाणी मतदान अधिकारी तसेच पोलीसही महिलाच राहणार आहेत.