मनपाच्या वैद्यकीय आराेग्यपदी कनिष्ठ डाॅक्टरची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:45 AM2021-07-14T04:45:05+5:302021-07-14T04:45:05+5:30
भिवंडी : भिवंडी शहर हे कामगारांचे शहर असून येथील सर्वसामान्य रुग्णांवर याेग्य उपचार व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने बीएएमएस डॉक्टरांची ...
भिवंडी : भिवंडी शहर हे कामगारांचे शहर असून येथील सर्वसामान्य रुग्णांवर याेग्य उपचार व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने बीएएमएस डॉक्टरांची आरसीएच म्हणजे प्रजनत बाल आरोग्य अधिकारी म्हणून रुजू करून घेतले आहे. या कमी दर्जाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या नेमणुकीने शहरातील वैद्यकीय व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.
कनिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी शहरातील आरोग्य केंद्रांमध्येही नागरिकांना आरोग्य उपचार करून घेण्यासाठी खूपच त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नियुक्त कनिष्ठ डॉक्टरांचा कारभार भोंगळ असल्याने त्यांच्या नियुक्तीला खुद्द महापौर प्रतिभा पाटील यांनी आक्षेप घेत त्यांची नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी पालिका आयुक्त आणि पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांकडे केली आहे.
भिवंडी महापालिका आरोग्य विभाग नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडते. तत्कालीन आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी २५ जानेवारी २०२१ रोजी डॉ. वर्षा बारोड या कनिष्ठ दर्जाच्या बीएएमएस डॉक्टारांची आरसीएच (प्रजनत बाल आरोग्य अधिकारी) म्हणून नियुक्ती केली आहे. वास्तविक पाहता नियमानुसार या पदावर एमबीबीएस डॉक्टारांची आरसीएच म्हणून नियुक्ती करणे अपेक्षित होते. याविरोधात महापौर प्रतिभा पाटील यांनी ही नेमणूक रद्द करण्याच्या मागणीचे पत्र २९ एप्रिल २०२१ रोजी दिले होते. याच पत्राची गंभीर दखल घेत महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. के.आर. खरात यांनी ७ जून २०२१ रोजी पालिका प्रशासनास अहवाल सादर केला आहे. आता महापालिका प्रशासन यावर निर्णय घेऊन ज्या एमबीबीएस डॉक्टारांवर अन्याय झाला, त्यांना न्याय मिळवून देण्यास कनिष्ठ डॉक्टरांची नियुक्ती रद्द करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.