मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी काटकर यांची नियुक्ती
By धीरज परब | Published: August 9, 2023 08:54 PM2023-08-09T20:54:04+5:302023-08-09T20:54:11+5:30
मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची अडीज वर्षांच्या कार्यकाळा नंतर शासना कडून बदली करण्यात आली आहे .
मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांची अडीज वर्षांच्या कार्यकाळा नंतर शासना कडून बदली करण्यात आली आहे . त्यांच्या जागी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची नियुक्ती करण्यात आली असून सनदी अधिकारी असलेले काटकर यांनी बुधवारी सायंकाळी पालिका मुख्यालयात येऊन पदभार स्वीकारला.
तत्कालीन नगरविकास मंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ढोले यांची ओळख होती . नोव्हेम्बर २०२० मध्ये शासनाने दिलीप ढोले यांची महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती केली होती . अतिरिक्त आयुक्त म्हणून आलेल्या ढोले यांना शासनाने ३ मार्च २०२१ रोजी महापालिका आयुक्त म्हणून नियुक्त केले होते . कोरोनाच्या काळात तसेच स्वच्छता अभियान, माझी वासुधंरा अभियान आदी उपक्रमात महापालिकेने उल्लेखनीय कार्य केल्या बद्दल ढोले यांना शासनाने विविध पारितोषिके देऊन सन्मानित केले होते .
तर दुसरीकडे ढोले हे आयुक्त पदी पात्र नसल्या चे आरोप करत काहींनी शासना सह न्यायालयात सुद्धा धाव घेतली होती . २००० सालच्या बनावट युएलसी प्रमाणपत्र प्रकरणी २०१६ साली ठाण्यात दाखल गुन्ह्या प्रकरणातच ईडी ने इंट्री घेत पालिका आयुक्तां कडून संबंधित प्रकरणाची कागदपत्रे मागवली होती .
दरम्यान बुधवार ९ ऑगस्ट रोजी शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या पत्रा नुसार सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांची मीरा भाईंदर महापालिका आयुक्त पदी नियुक्ती केली आहे . ढोले यांच्या कडून पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे गद्रे यांनी म्हटले आहे .
त्यानुसार सायंकाळी काटकर यांनी महापालिका मुख्यालयात येऊन आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला . अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, उपायुक्त कल्पिता पिंपळे , मारुती गायकवाड , संजय शिंदे , रवी पवार आदींनी नवीन आयुक्तांची भेट घेऊन स्वागत केले .