ठाण्यातील कंटेनमेंट झोनवर लक्ष ठेवण्यासाठी दोन विशेष पोलीस उपायुक्तांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 12:44 AM2020-05-27T00:44:46+5:302020-05-27T00:48:47+5:30
कंटेनमेंट झोनच्या परिसरातील कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांसाठी आणखी दोन अतिरिक्त पोलीस उपायुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यासाठी दीपक देवराज तर वागळे इस्टेटसाठी संजय जाधव यांच्याकडे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी अतिरिक्त पदभार सोपविल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांसाठी आणखी दोन उपायुक्तांची नियुक्ती पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी केली. ठाण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे दीपक देवराज तर वागळे इस्टेटसाठी आर्थिक गुन्हे शाखेचे उपायुक्त संजय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील वागळे इस्टेट आणि ठाणे शहर या दोन परिमंडळांच्या परिसरातील मुंब्रा, राबोडी, कळवा तसेच वागळे इस्टेट, श्रीनगर आणि कोपरी या भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. २५ मे अखेर ठाणे महापालिका क्षेत्रात दोन हजार १७२ जणांना कोरोनाची बाधा झाली. यातील ८३८ कोरानातून मुक्त झाले. तर ६७ जणांचा मृत्यु झाला. कंटेनमेंट झोनमध्ये संचारबंदी कडक असतांना अनेकजण सर्रास त्याचे उल्लंघन करतात. अनावश्यकपणे घराबाहेर पडतात. कंटेनमेंट झोनमध्ये जर संक्रमण वाढले तर त्याचा धोका इतरही भागात होऊ शकतो. त्यामुळेच ठाणे आणि वागळे इस्टेट या दोन परिमंडळांमधील सुमारे २५० कंटेनमेंट झोनवर हे दोन उपायुक्त विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. त्यासाठी खास पोलीस बंदोबस्तही राहणार असून हे उपायुक्त त्या त्या कंटेनमेंटमध्ये अचानक भेटीही देणार आहेत. या भागातील वाहनांवर आणि दुकानांवरही निर्बंध राहणार आहेत. परिमंडळ एकचे सध्याचे उपायुक्त सुभाष बुरसे आणि वागळे इस्टेटचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्याकडे नियमित कायदा सुव्यवस्था, मजूरांच्या स्थलांतराची जबाबदारी तसेच कंटेनमेंट झोनच्या बाहेरील बंदोबस्त आदी कामांची विभागणी करण्यात आली आहे. तर कंटेनमेंटची जबाबदारी असलेले उपायुक्त देवराज यांच्याकडे कळवा, मुंब्रा, राबोडी, डायघर आणि ठाणेनगर या पोलीस ठाण्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर उपायुक्त जाधव यांच्याकडे वागळे इस्टेट, श्रीनगर, कोपरी, वर्तकनगर, कापूरबावडी, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत येणाऱ्या कंटेनमेंट झोनची जबाबदारी आहे.
उथळसर, माजीवडा, वर्तकनगर,लोकमान्यनगर, वागळे इस्टेट, नौपाडा-कोपरी, कळवा, मुंब्रा आणि दिवा या नऊ प्रभाग समिती क्षेत्रांमध्ये २३९ कंटेनमेंट झोन आहेत. एकटया मुंब्रा भागात ३० पेक्षा अधिक कंटेनमेंट झोन आहेत. स्थानिक पोलिसावरील वाढता ताण लक्षात घेऊन नुकतीच या भागांमध्ये केंद्रीय शीघ्र कृती दलाचीही नियुक्ती केली आहे. आता अतिरिक्त दोन उपायुक्तांमुळे या कंटेनमेंट झोनवर निगराणी करणे सोपे जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.