परिवहनसाठी २२ ला अर्जस्वीकृती
By admin | Published: February 17, 2017 02:05 AM2017-02-17T02:05:44+5:302017-02-17T02:05:44+5:30
कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होत
कल्याण : कोणत्याच राजकीय पक्षाने अर्ज न भरल्याने केडीएमसीच्या परिवहन समितीची पुढे ढकलण्यात आलेली निवडणूक २८ फेब्रुवारीला होत आहे. या निवडणुकीसाठी २२ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत. शुक्रवारपासून अर्जांचे वितरण होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी गुप्त मतदान पद्धत अवलंबली जाणार असल्याने ही निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत.
एकीकडे अर्ज दाखल न झाल्याने परिवहन समितीची निवडणूक पुढे ढकलण्याची नामुश्की केडीएमसी प्रशासनावर ओढवली आहे. त्यात निवडणुकीची गुप्त मतदानाची पद्धत चुकीची असल्याबाबतची हरकत महापालिकेचे माजी सचिव चंद्रकांत माने यांनी घेतली आहे. निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी प्रमाणशीर प्रतिनिधित्वानुसार निवडणूक घेण्याची तरतूद केली असताना चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवली जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. नियमानुसार प्रक्रिया पार न पाडल्यास नगरविकास विभागाकडे तक्रार तसेच प्रसंगी न्यायालयात जाण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. मात्र, सहा सदस्यांच्या निवडीसाठी गुप्त मतदानाची प्रक्रियाच राबवली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मुंबई, ठाणे, उल्हासनगर आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकांचे मतदान आटोपताच दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ फेब्रुवारीला अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
दरम्यान, शिवसेना-भाजपात इच्छुकांची भाऊगर्दी असल्याने सदस्यांना संधी देताना डावलल्यांची नाराजीही ओढून घ्यावी लागणार आहे. याचा प्रत्यय मागील प्रक्रियेच्या वेळी आला होता. या वेळीदेखील हे चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)