पुलाच्या आराखड्याला दोन दिवसांत मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 11:22 PM2019-11-06T23:22:24+5:302019-11-06T23:22:38+5:30
रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा दावा : कोपरसह विविध पुलांबाबत आमदारांनी घेतली भेट
कल्याण : डोंबिवलीतील कोपर दिशेकडील रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचा आराखडा केडीएमसीने मध्य रेल्वेकडे सादर केला आहे. या आराखड्याला दोन दिवसांत मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन रेल्वे प्रशासनाने बुधवारी दिले. कोपर रेल्वे उड्डाणपूल, लोकग्रामचा पादचारी पूल, पत्रीपूल आणि डोंबिवली स्थानकातील पादचारी पूल यासंदर्भात कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे एडीएमआर एस.आर. कक्कड यांची भेट घेतली. याप्रसंगी मनसे रेल्वे कामगारसेनेचे जितेंद्र पाटील, केडीएमसीतील मनसेचे विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर, गटनेते मंदार हळबे, पदाधिकारी हर्षद पाटील, मनोज घरत उपस्थित होते.
कोपर रेल्वे उड्डाणपूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याने रेल्वेच्या आदेशानुसार महापालिकेने बंद केला. त्याच्या दुरुस्तीचा आराखडा १७ आॅक्टोबरला महापालिकेने रेल्वेकडे पाठविला. मात्र, रेल्वेकडून त्याची मंजुरी देण्यात दिरंगाई होत असल्याने पाटील यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी रेल्वे अधिकाºयांनी कोपर पुलाच्या दुरुस्तीचा आराखडा दोन दिवसांत मंजूर केला जाईल, असे आश्वासन दिले. कल्याण रेल्वेस्थानक ते लोकग्रामला जोडणारा पादचारी पूलही सध्या बंद करण्यात आला आहे. हा पूल महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत नव्याने उभारला जाणार आहे. या पुलासंदर्भात महापालिका, स्मार्ट सिटीचे अधिकारी आणि रेल्वे प्रशासन यांची पाटील यांच्या उपस्थितीत लवकरच संयुक्त बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
त्याचबरोबर कल्याण-शीळ रस्त्यावरील कल्याणच्या पत्रीपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. या पुलाचे काम फेब्रुवारी २०२० मध्ये पूर्ण केले जाईल, असे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, सध्याची कामाची गती पाहता कामाची डेडलाइन पाळली जाणार का, असा सवाल पाटील यांनी केला. त्यावर यासंदर्भात एमएसआरडीसी, रेल्वे, महापालिका यांच्यासोबत आमदारांचा संयुक्त पाहणी दौरा करून कामाची प्रत्यक्ष पाहणी केली जाईल, असे रेल्वेकडून सांगण्यात आले.
आराखडा मंजूर करण्याची राज्यमंत्र्यांची मागणी
डोंबिवली : कोपर उड्डाणपुलासंदर्भात केडीएमसीने सादर केलेला आराखडा तातडीने मंजूर करावा, अशी मागणी करणारे पत्र राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक एस.के. जैन यांना दिले. महापालिकेने २० दिवसांपूर्वी मध्य रेल्वेला या पुलाच्या कामासंदर्भात सुधारित आराखडा पाठवला होता. परंतु, रेल्वेकडून सकारात्मक उत्तर आलेले नाही, असे महापालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे रेल्वेने सहकार्य करावे. हा पूल बंद असल्याने पूर्व-पश्चिमेतील वाहतूक ठाकुर्लीच्या अरुंद पुलावरून सुरू आहे. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे. पुलाच्या कामासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. रेल्वेने तातडीने आराखड्याला मंजुरी दिल्यास निधीची तरतूद व अन्य प्रक्रिया पार पाडता येईल. त्यामुळे रेल्वेने तांत्रिक बाबींची पूर्तता करावी, असे पत्रात म्हटल्याचे चव्हाण म्हणाले. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे आणखी एका नव्या पुलाचाही आराखडा मंजूर करावा, असेही आदेशित केल्याचे पत्राद्वारे स्मरण करून दिले आहे.