काळातलाव परिसर विकासाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:40 PM2020-09-28T23:40:35+5:302020-09-28T23:40:56+5:30
कायापालट होणार : पहिल्या टप्प्यात १७ कोटींचा खर्च
कल्याण : पश्चिमेतील ऐतिहासिक काळातलावाचा ५२ कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १७ कोटींच्या विकासाला नुकत्याच झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, त्यात प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाचा समावेश नाही. प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी हा विषय मार्गी लागला असता, तर प्रकल्पाची वाट सुकर झाली असती, याकडे शिवसेना नगरसेवकाने लक्ष वेधले आहे.
काळातलावाचा परिघ हा एक किलोमीटरपेक्षा जास्त आहे. मात्र, तलावाभोवती ४०० घरांची लोकवस्ती असून, ती आरक्षित जागेवर आहे. ही जागा राम मंदिर व काळी मशीद यांच्या नावे आहे. मात्र, ही जागा ताब्यात घेण्यात मनपा प्रशासनाकडून असमर्थता दर्शवली जात आहे. ४०० घरांमधील नागरिकांचे पुनर्वसन केंद्र सरकारच्या बीएसयूपी योजनेत करण्यासाठी त्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची २०१६ मध्ये मनपा प्रशासनाने छाननी केली होती. हे बाधित त्यांचे पुनर्वसन अन्य ठिकाणी केल्यास तेथे जाण्यास सहमत आहेत. महापालिकेने सर्वेक्षण व कागदपत्रांची छाननी केली, पण त्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न आहे. २००२ मध्ये मनपाने पुनर्वसनासाठी दोन कोटी रुपयांचा निधी ठेवला होता. त्या निधीचे काय झाले, तो कोणत्या कामावर खर्च केला, या प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहेत.
शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक सचिन व सुधीर बासरे म्हणाले की, शहाड येथील साई निर्वाणा ही रेंटल बेसिसवर उभारलेली इमारत मनपाच्या ताब्यात आली आहे. त्यातील ३१८ सदनिका मनपाने कोविड सेंटरसाठी घेतल्या आहेत. कोरोना संपल्यावर काळातलावबाधितांची त्यात पर्यायी व्यवस्था केल्यास तलावाच्या विकासाचा मार्ग सुकर होईल. मात्र, त्याला बाधितांचा विरोध होण्याची शक्यता आहे.
२०१२ मध्ये तलाव व परिसराचा विकास
२०१२ मध्ये पहिल्या प्रयत्नात आठ कोटी रुपये खर्च करून तलावाचा विकास करण्यात आला. रंगीत संगीत कारंजे, बाग, खेळणी आदी विकसित करण्यात आले. तसेच तेथे नौकाविहार सुरू केला होता. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनापश्चात त्यांचे स्मारक याच काळातलाव परिसरात उभारले गेले. तेथे आर्ट गॅलरी, बाळासाहेबांचा पुतळा आदी गोष्टी विकसित केल्या गेल्या. त्यावर १० कोटी रुपयांचा खर्च झाला.