स्थायीत चुकीच्या पध्दतीने विषयांना दिली मंजुरी
By admin | Published: May 25, 2017 12:04 AM2017-05-25T00:04:37+5:302017-05-25T00:04:37+5:30
अंबरनाथ नगरपालिकेच्या स्थायी समितीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेच्या स्थायी समितीचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. प्रभागातील विकासकामांची यादी तयार नसतानाही परस्पर विषय मंजूर करून घेण्यात आले. त्यामुळे स्थायी समितीत मंजूर झालेले विषय नेमके कोणते होते याची कल्पना कोणत्याच नगरसेवकांना नाही. या आधीही सर्वसाधारण सभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत अशाच प्रकारे शहरातील विकासकामांना मंजुरी घेतली होती. या मंजूर विषयांमध्ये काही नगरसेवक आणि पदाधिकारी हे परस्पर आपल्या प्रभागातील विषय वाढवत आहेत.
अंबरनाथ पालिकेत आर्थिक विषय मंजूर करताना त्या विषयांची टिप्पणी बंधनकारक केल्याने विषयाला मंजुरी देणे सोपे जाते. मात्र सहा महिन्यात आर्थिक विषय मंजूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी चुकीची पध्दत अवलंबण्यास सुरूवात केली आहे. विषय समिती असो वा सर्वसाधारण सभा या दोन्ही सभेत प्रभागातील विषय मंजूर करताना नेमके कोणते विषय मंजूर केले याची यादी देणे गरजेचे आहे.
यादीतील विषयांना मंजुरी दिल्यावर त्याचा ठराव करून त्यांच्या निविदा काढण्याचा नियम आहे. मात्र अंबरनाथ पालिकेत तीन वेळा विषयांची यादी निश्चित नसताना परस्पर आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक नगरसेवकांचे विषय त्या पत्रिकेत असल्याने कोणताच नगरसेवक त्यास विरोध करत नाही. मात्र काही नगरसेवक याच संधीचा लाभ घेऊन परस्पर आपले वाढीव विषय अधिकाऱ्यांना दमदाटी करून टाकत आहेत. विषयांची यादीच निश्चित नसल्याने अधिकारीही दबंग नगरसेवकांच्या दबावाला बळी पडून परस्पर या यादीत विषय मंजूर करून घेत आहेत. थेट १ ते ५७ प्रभागांच्या आर्थिक विषयांना मंजुरी देण्याचा विषय घेऊन यादी नसताना हे विषय मंजूर केल्याने नेमक्या कोणत्या नगरसेवकांच्या प्रभागात किती विषय आले याची माहितीच मिळत नाही. १ ते ५७ प्रभागातील विषयांच्या यादीत वाढीव विषय समाविष्ट करुन हे विषय देखील मंजूर झाले असे दर्शविण्याचे काम पालिकेत सुरू आहे.