घोडबंदर भागातील पेट पार्कचा नामंजुर प्रस्ताव अवघ्या पाच मिनिटांत झाला मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 03:17 PM2018-12-27T15:17:25+5:302018-12-27T15:18:33+5:30
अवघ्या पाच मिनिटांतच नामंजुर झालेला पेट पार्कचा प्रस्ताव मंजुर करण्याची घटना ठाणे महापालिकेच्या महासभेत घडली आहे. केवळ स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेण्याच्या मुद्यावरुन नामंजुर झालेला प्रस्ताव मंजुर झाला.
ठाणे - भटक्या कुत्र्यांसह पाळीव प्राण्यांवर उपचार करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील कावेसर या भागात ५ हजार चौरस मीटर जागेवर महापालिका पाळीव - भटक्या प्राण्यांकरीता उपचार केंद्र, नसबंदी केंद्र, आधारगृह, स्मशानभुमी असे एकाच छताखाली पेट पार्क विकसित केले जाणार आहे. परंतु पालिकेच्या या प्रस्तावाला सत्ताधारी नगरसेवकाने बुधवारच्या महासभेत विरोध दर्शविला. त्यामुळे महापौरांनी हा प्रस्ताव नामंजुर केला. परंतु अवघ्या पाचच मिनिटात राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हा प्रस्ताव मंजुर करावा अशी मागणी करीत स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घेतले जावे, आणि पालिकेने प्रस्तावित केलेली जागा योग्य नसेल तर दुसरीकडे विचार केला जावा असे सांगत हा प्रस्ताव मंजुर करुन घेतला.
ठाणे महापालिकेच्या या प्रस्तावानुसार प्राण्यांची नसबंदी, प्राण्यांवर उपचार, आधारगृहे - कोंडवाडा, शवदहन वाहीनी, पेट पार्क विकसित केली जाणार आहे. यासाठी ५ हजार चौरस मीटर क्षेत्राच्या भुखंडाची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार घोडबंदर भागातील कावेसार येथील पार्कचे आरक्षण असलेल्या भुखंडावर हे विकसित केले जाणार आहे. याठिकाणी पार्कचे ११८००.०० चौरस मीटरचे आरक्षण असून त्यातील ५ हजार चौरस मीटर आरक्षणावर हे सुविधा केंद्र विकसित केले जाणार आहे. खाजगी सहभागातून याची उभारणी व त्याचे परिचालन करणे प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबई व ठाणे परिसरातील विविध प्राणीमित्र संस्थांना यासाठी पाचारण केले जाणार आहे. त्यानुसार केंद्राची उभारणी करणे व त्याचे परिचालन करण्याकरीत खाजगी स्वारस्य देकार मागविले जाणार असून अटी - शर्ती निर्धारीत करण्यासाठी आयुक्तांना अधिकार देण्यात येणार आहेत.
परंतु शिवसेनेचे नगरसेवक नरेश मणेरा यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. त्यांच्या मते येथील रहिवाशांचा सुध्दा या पार्कला विरोध असल्याचे म्हंटले आहे. येथील लोकसंख्या वाढलेली असून, तसेच भविष्यातही येथे नागरीकरण होणार आहे. त्यामुळे येथे मैदाने, पार्क, उद्याने, रुग्णालये आदींची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे. त्यातही पालिकेने जो भुखंड प्रस्तावित केला आहे, तो नागरी वस्तीच्या मधोमध आहे. त्यामुळे या पेटपार्कला आमचा विरोध असेल अशी भुमिका घेतली होती. त्यानुसार महासभेत सुध्दा त्यांनी आपला विरोध कायम ठेवला, त्यामुळे महापौर मीनाक्षी शिंदे यांनी हा प्रस्ताव नामंजुर केला. परंतु अवघ्या पाच मिनिटातच राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी हा प्रस्ताव मंजुर करावा अशी भुमिका घेतली. परंतु यामध्ये स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे, जागा अयोग्य असेल तर दुसऱ्या जागेचा विचार करावा अशी मागणी करीत हा प्रस्ताव मंजुर करुन घेतला.