भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:56 AM2021-04-06T01:56:55+5:302021-04-06T01:57:04+5:30

पाण्याची गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला येणार यश  

Approval of Rs. 200 crore for development work of Bhatsa Dam | भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

भातसा धरणाच्या विकासकामांसाठी २०० कोटींच्या निधीस मंजुरी 

Next

- रवींद्र सोनावळे

शेणवा : मुंबई व ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या मजबुतीकरणासाठी व धरणक्षेत्रातील अन्य आवश्यक असलेल्या विकासकामांसाठी राज्य सरकारने २०० कोटी ६६ लाखांचा निधी मंजूर केला आहे. भातसा धरणाच्या या बळकटीकरणाच्या कामामुळे धरणाची पाण्याची गळती पूर्णपणे रोखण्यात जलसंपदा विभागाला यश येणार असल्याचा दावा अभियंत्यांकडून केला जात आहे.

सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने भातसा धरणास हा निधी मंजूर केल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने निविदा प्रक्रियेस मान्यता दिली आहे. यात भातसा धरणाच्या कामाचाही समावेश असून, धरण पुनर्स्थापना व सुधारणा प्रकल्प टप्पा २ व ३ या प्रकल्पातील कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे.

मंजुरी दिलेल्या या निधीपैकी पहिल्या टप्यात ११४ कोटींची कामे हाती घेतली जाणार असून, विशेष म्हणजे ही कामे अत्याधुनिक व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणार आहेत. यामध्ये भातसा धरणाच्या ऊर्ध्व व अधो बाजूकडील (रँकिंग) सांधे भरणे या महत्त्वपूर्ण कामांचा समावेश आहे. धरण मुख्य गेट, अंतर्गत लिफ्ट याची डागडुजी करणे व धरणावरील विद्युत प्रणालीची देखभाल व दुरुस्ती करणे, धरण माथ्यावर जाणारे पोहच रस्ते तयार करणे ही कामे या निधीतून केली जाणार आहेत, अशी माहिती भातसा धरणाचे सहायक अभियंता श्याम हंबीर व गणेश कचरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

Web Title: Approval of Rs. 200 crore for development work of Bhatsa Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.