खरीप हंगामासाठी १२ हजार टन खत पुरवठ्यास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:40 AM2021-03-19T04:40:28+5:302021-03-19T04:40:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी पुणे येथील कृषी आयुक्तालयाने ठाणे जिल्ह्यातील शेतीसाठी ११ हजार ९६० टन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : यंदाच्या खरीप हंगामासाठी पुणे येथील कृषी आयुक्तालयाने ठाणे जिल्ह्यातील शेतीसाठी ११ हजार ९६० टन रासायनिक खत पुरवठ्याच्या नियोजनास मंजुरी दिली आहे. या खतांचे वितरण योग्य रीतीने करून अनुदानाचा गैरवापर होऊ नये म्हणून ई-पॉस मशीन, तर खत वाहतुकीवेळी जीपीएस प्रणालीचा वापर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगामासाठी आवश्यक असलेल्या खत पुरवठ्याच्या आवंटनाला (वापराला) जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहातही बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी विकास अधिकारी श्रीधर काळे, खतपुरवठा कंपनीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात खतांची वाहतूक करताना वाहनात जीपीएस प्रणालीचा वापर करणे अनिवार्य करावे, खरीप हंगामात दर्जेदार कंपन्यांच्या भातबियाणांचा पुरवठा शेतकऱ्यांना करावा, कोणत्याही तक्रारी येणार नाहीत याची दक्षता घेण्याची सूचना डॉ. सातपुते यांनी केली. कृषिसेवा केंद्रनिहाय व तालुकानिहाय शासनाच्या आवंटनानुसार खतांचे नियोजन करून ऐन खरीप हंगामात रासायनिक खतांचा तुटवडा झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर्सच्या अलिबाग प्रकल्पातून खतांचे नियोजन करावे, खतांच्या खरेदी-विक्रीचे अभिलेख अद्ययावत करणे अपेक्षित आहे. तर शेतकऱ्यांकडून जादा दराने खत विक्री, इतर खतांचे लिंकिंग करणे, खते वेळेवर उपलब्ध न होणे आदींच्या तक्रारी येणार नाहीत, या दृष्टीने खबरदारी घेण्याच्या मुद्द्यांवर या वेळी चर्चा झाली.
‘एप्रिल- मेमध्येच पुरेसा साठा करा’
- भातपिकासाठी संतुलित पद्धतीने रासायनिक खतांचा वापर करण्याची गरज लक्षात घेऊन शेतकऱ्यांना लागवडीच्या प्रमाणातच खताची विक्री करण्याच्या नियोजनावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी या बैठकीत लक्ष वेधले आहे.
- एप्रिल व मेमध्ये आवंटनानुसार खतांची खरेदी करून बफर स्टॉक तयार करावा, जेणेकरून ऐन खरीप हंगामाच्या जून, जुलै व ऑगस्ट या कालावधीत खतांचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज माने यांनी व्यक्त केली.
- गोदामामधील प्रत्यक्ष साठा व ई-पाॅस मशीनमधील खतसाठा यांचा वेळोवेळी ताळमेळ घ्यावा. भाताच्या जाती निवडताना स्थानिक हवामान पद्धती, त्याची उत्पादकता, उगवण क्षमता, शेतकऱ्यांची गरज इत्यादी गोष्टींचा विचार करून बियाण्याची निवड करण्याचे मार्गदर्शन माने यांनी उपस्थितांना केले.
----------------------