जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतरास मंजुरी, नर्सिंग प्रशिक्षण केंद्र मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2019 02:39 AM2019-02-09T02:39:12+5:302019-02-09T02:39:37+5:30
ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासननिर्णय ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला आहे.
ठाणे - ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे स्थलांतर करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून तसा शासननिर्णय ७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये रुग्णालयातील विविध २० विभाग नेमके कोणत्या ठिकाणी स्थलांतरित करावेत, याबाबत स्पष्ट केले आहे. रुग्णालयासह नर्सिंग प्रशिक्षण केंद्रही स्थलांतराबाबत जागा निश्चित करण्यात आली आहे.
सामान्य रुग्णालयाच्या जुन्या ओपीडी इमारतीमधील प्रसूती वॉर्ड, पीएनसीयू कक्ष तसेच नव्या ओपीडी इमारतीमधील शस्त्रक्रिया, गायनिक ओपीडी लसीकरण विभाग, नेत्रविभाग इमारतीतील लहान मुलांचा कक्ष, एनआरसी विभाग, जुन्या ओपीडी इमारतीमधील जिल्हा शल्यचिकित्सक, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांची दालने तसेच नवीन ओपीडी इमारतीतील सोनोग्राफी विभाग, रक्तपेढी विभाग आणि एआरटी आणि डीआयसी विभाग असे प्रमुख विभाग हे मनोरुग्णालयाच्या आवारात नव्याने बांधलेल्या आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र तसेच वसतिगृहाच्या इमारतीत स्थलांतरित होणार आहेत. नेत्र विभाग हे भिवंडी उपजिल्हा रुग्णालय किंवा ठामपाच्या रोझा गार्डन येथील आरोग्य केंद्राच्या इमारतीत अथवा मनोरुग्णालयाच्या आवारातील नव्याने बांधलेल्या प्रशिक्षण केंद्राच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये होणार आहेत.
नवीन ओपीडी इमारतीमधील ईसीजी विभाग हे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील प्रथम टप्प्यात न पाडावयाच्या अपघात विभागाच्या इमारतीत किंवा जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील निवासस्थानांच्या चाळीमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. नवीन ओपीडी इमारतीमधील केसपेपर विभाग व औषध वितरण विभाग हे जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागाच्या इमारतीच्या कॉरिडोरमध्ये किंवा आवारातील निवासस्थानांच्या चाळीमध्ये होणार आहे. दंत व श्रवण विभाग, हिमॅटॉलॉजी विभाग व मानसोपचार ओपीडी आयुष विभाग, स्वाइन फ्लू विभाग हे जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील अॅन्सिलरी इमारतीमध्ये किंवा निवासस्थानांमध्ये जाणार आहेत. अपघात विभाग इमारतीमधील पुरुष व स्त्री जळीत कक्ष हे एकत्रित करून तेथेच कार्यरत ठेवले जाणार आहेत.
खर्चाला मिळाली प्रशासकीय मान्यता
सामान्य रूग्णालयातील क्ष किरण विभाग अपघात विभागात, तर अपघात विभागातील टेलिमेडिसीन व रा.आ.अ. विभाग हे रुग्णालयाच्या प्रशासकीय कार्यालयात नेले जाणार आहेत. त्याचबरोबर नर्सिंग प्रशिक्षण केंद्र हे मालाड येथील मालवणीच्या सामान्य रुग्णालयात किंवा मुंबईतील कामा व आल्ब्लेस स्त्री रुग्णालयात स्थलांतरित करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या स्थलांतरित करण्याकरिता लागणाऱ्या खर्चाच्या अंदाजपत्रकास स्वतंत्रपणे प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे.