स्वीकृत नगरसेवकांसाठी डॉक्टर, इंजिनीअर्सनाही संधी
By admin | Published: November 16, 2015 02:16 AM2015-11-16T02:16:18+5:302015-11-16T02:16:18+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे
प्रशांत माने, कल्याण
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी पक्षांतर्गत मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. परंतु, महाराष्ट्र महानगरपालिका नियम २०१२ च्या कायद्यानुसार या पदासाठी महापालिकेच्या प्रशासकीय कामाचा अनुभव बंधनकारक केला असून याचा दांडगा अनुभव असलेल्या माजी प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबरच शिक्षणतज्ज्ञ, डॉक्टर, इंजिनीअर यांनाही या पदावर संधी देण्यात यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे राजकीय पक्षांतील इच्छुक आणि नाराजांची चांगलीच पंचाईत होणार आहे.
स्वीकृतपदी निवड करताना सर्वच राजकीय पक्षांकडून कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाते. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांना स्वीकृत पद देण्याचेही आमिष दाखविले जाते. त्यातच माजी नगरसेवकही पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून येण्यासाठी स्वीकृतचा आधार घ्यायचे, परंतु आता नव्या कायद्यानुसार याला खीळ बसणार आहे. एखाद्या व्यक्तीकडे महापालिका प्रशासनाचे विशेष ज्ञान असेल किंवा अनुभव असेल तर ती व्यक्ती स्वीकृतसाठी पात्र ठरेल, अशी अट बंधनकारक झाली आहे. याचबरोबर डॉक्टरकीचा किमान पाच वर्षांचा अनुभव, तसेच शिक्षणतज्ञ, निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक यांनाही प्राधान्य असणार आहे. सनदी लेखापाल, इंजिनीअर हेदेखील स्वीकृतसाठी पात्र ठरू शकणार आहेत. नगरपरिषदेचा मुख्याधिकारी किंवा महानगरपालिकेचा सहायक आयुक्त, उपायुक्त म्हणून काम करण्याचा किमान पाच वर्षांचा अनुभव तसेच किमान दोन वर्षांचा अनुभव असलेली महानगरपालिकेतून आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेली व्यक्तीसुद्धा स्वीकृतपदी असावी, अशी अट असून नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारीही या पदासाठी पात्र ठरू शकतो.