वसईतून अंदाजे ५४ लाखांचा अन्नपदार्थांचा साठा जप्त; ठाणे एफडीएची कारवाई
By अजित मांडके | Published: November 4, 2022 03:24 PM2022-11-04T15:24:48+5:302022-11-04T15:26:02+5:30
केलेल्या कारवाईत प्रामुख्याने विविध मसाल्यांचा समावेश आहे.
ठाणे : ठाणे अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहिमेअंतर्गत पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील वसई येथून अंदाजे ५४ लाखांचा संशयित अन्नपदार्थाचा साठा जप्त करण्यात आला. गुरुवारी केलेल्या कारवाईत प्रामुख्याने विविध मसाल्यांचा समावेश आहे.
दैनंदिन जीवनात ग्राहकाकडून नियमितपणे उपयोगात आणल्या जाणाऱ्या विविध अन्नपदार्थासह "खाद्यतेल" व "पावडर मसाले" यांच्या गुणवत्ता व दर्जा यांची खात्री व खातरजमा करण्यासह सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासन,कोकण विभाग,सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२ रोजी पालघर जिल्ह्यातील वसई (पूर्व) नायगाव येथील मेसर्स जे. जे. सिझनिंगअँड स्पाइसेस,या ,"उत्पादक" अन्न आस्थापनातून हळद पावडर (वजन ३,४०२ किलो), धणे पावडर (वजन ५१९ किलो), जेरालू पावडर (वजन ६२८ किलो), जलजीरा पावडर (वजन १,२५८ किलो), गरम मसाला (वजन १,०६९ किलो), चिकन मसाला (वजन ६०६ किलो), किचन किंग मसाला (वजन ८३८ किलो),अप मसाला (वजन ६७८ किलो), लोणचे मसाला (वजन १,८७३ किलो), चिवडा मसाला (वजन २,७९८ किलो), चटपटा मसाला (वजन १२३ किलो), लाल मिरची पावडर (वजन ७९६ किलो), व्हाईट चायनीज मसाला (वजन ३९८ किलो), शेजवान मसाला (वजन ९६ किलो) तसेच मालवणी मिक्स मसाला (वजन १३ किलो) असा एकूण रुपये ५३ लाख ७७ हजार ३२२ रुपये किंमतीचा संशयित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला आहे. ही करावाई अन्न व औषध प्रशासन, कोकण विभाग, सह आयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांच्या सूचनेनुसार पालघर अन्न सुरक्षा अधिकारी धनश्री ढाणे, प्रवीण सूर्यवंशी, दत्ता साळुंखे व योगेश ठाणे यांनी केली.