एप्रिल फूल, डब्बा गुल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:42 AM2021-04-02T04:42:35+5:302021-04-02T04:42:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : शहरातील उड्डाणपुलांची कामे धीम्या गतीने सुरू असल्याने याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. परिणामी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शहरातील उड्डाणपुलांची कामे धीम्या गतीने सुरू असल्याने याचा नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. परिणामी वाहतूककोंडीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या होणाऱ्या त्रासाचा १ एप्रिलचे औचित्य साधत मनसेने गुरुवारी केक कापून उपरोधिक निषेध केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागले असले तरी डोंबिवलीतील कोपर पूल, मोठा गाव-माणकोली पूल? आणि ठाकुर्लीतील उड्डाणपूल यांची कामे संथगतीने सुरू आहेत. यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. पुलांची काम धीम्या गतीने सुरू असल्याने याचा निषेध म्हणून मनसेने अनोख्या पद्धतीने केक कापला. मनसेचे केडीएमसीचे माजी विरोधीपक्ष नेते व जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, माजी परिवहन सदस्य प्रल्हाद म्हात्रे, संदीप (रमा) म्हात्रे, श्रीकांत वारंगे, हिम्मत म्हात्रे, मनविसे शहरसचिव प्रितेश म्हामूणकर आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरात केलेल्या या कार्यक्रमात एप्रिल फूल, डब्बा गुल, कधी होणार डोंबिवलीतले पूल? अशा घोषणा देत केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यात आला. अनेक वर्षांपासून डोंबिवलीतील पुलांची कामे रखडली आहेत. तारीख पे तारीख असाच काहीसा सिलसिला सुरू असून, नागरिकांना वारंवार एप्रिल फूल केले जात आहे. त्यामुळेच गुरुवारी १ एप्रिलच्या निमित्ताने राज्य सरकार, केडीएमसी प्रशासन आणि सत्ताधारी यांचा आम्ही अनोख्या पद्धतीने निषेध केला असल्याचे मत भोईर यांनी यावेळी व्यक्त केले.
--------------------