भाईंदरमध्ये रिक्षाचालकांची मनमानी; सर्रासपणे प्रवाशांकडून होतेय बिनधास्त वसुली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 03:28 PM2021-12-24T15:28:50+5:302021-12-24T15:31:48+5:30

मीरारोड व काशीमीरा भागात मीटर प्रमाणेच शेअर भाडे तत्वावर रिक्षा चालवल्या जातात.

Arbitrariness of rickshaw pullers in Bhainder; Excessive recovery from passengers | भाईंदरमध्ये रिक्षाचालकांची मनमानी; सर्रासपणे प्रवाशांकडून होतेय बिनधास्त वसुली

भाईंदरमध्ये रिक्षाचालकांची मनमानी; सर्रासपणे प्रवाशांकडून होतेय बिनधास्त वसुली

googlenewsNext

मीरारोड - भाईंदरमध्ये शेअर भाडे तत्वावर रिक्षा चालवणाऱ्या अनेक रिक्षा चालकांकडून तीन ते चार प्रवासी बसवून देखील जास्तीचे शेअर भाडे आकारले जात आहे. भाईंदर पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर तसेच महत्वाच्या ठिकाणी शेअर भाडेपत्रकच लावण्यात आले नसल्याचा गैरफायदा घेतला जात आहे. प्रवाशांना तक्रारी कुठे करायच्या याची माहिती नाही तर दुसरीकडे प्रादेशिक परिवहन व वाहतूक पोलीस मात्र जनजागृती सह कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. 

मीरारोड व काशीमीरा भागात मीटर प्रमाणेच शेअर भाडे तत्वावर रिक्षा चालवल्या जातात. तर भाईंदरमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा न नेता केवळ शेअर रिक्षा तसेच स्पेशल भाडे तत्वावर रिक्षा चालवल्या जातात. कोरोनाच्या संसर्ग काळात रिक्षात केवळ २ प्रवासी बसवण्याचे शासनाचे निर्देश होते. परंतु रिक्षा चालकांनी केवळ स्वतःचा फायदा साधत प्रवाशांकडून ५० टक्के शेअरभाडे वाढवून घेतले. जेणे करून १० रुपये किमान भाडे असणाऱ्या शेअर रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून १५ रुपये किमान भाडे आकारण्यास सुरुवात केली. त्याच धर्तीवर प्रत्येक टप्प्यातील शेअर भाड्यात ५० टक्के वा त्यापेक्षा जास्त वाढ केली गेली. भाईंदर ते उत्तन शेअर भाडे तर ३० रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत केले गेले. 

कोरोनाचा उद्रेक कमी झाल्यानंतर देखील रिक्षात ३ ते ४ प्रवासी बसवून सुद्धा अनेक रिक्षा चालक शेअरभाडे मात्र वाढीव घेत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यातूनच भाईंदरमध्ये पूर्वी प्रमाणे तीन प्रवासी प्रमाणे किमान १० रुपये व त्या पुढील टप्प्यानुसार असलेले शेअर भाडे आकारण्याचा निर्णय नगरसेवक सुरेश खंडेलवाल आदींच्या मागणी नंतर वाहतूक पोलीस, रिक्षा संघटना यांनी चर्च अंती घेतला आहे. परंतु तसे असताना देखील अनेक रिक्षा चालक हे मनमानीपणे पूर्वी प्रमाणेच वाढीव भाडे घेत आहेत. 

भाईंदर पूर्वेवरून न्यू गोल्डन नेस्ट, गोल्डन नेस्ट व दीपक रुग्णालयापर्यंत प्रवाशांकडून २० रुपये प्रतिसीट शेअर भाडे घेत आहेत. इंद्रलोक, फाटक आदी ठिकाणी जाण्याचे किमान १५ रुपये शेअर भाडे घेतले जात आहे. विशेष म्हणजे ३ किंवा ४ सीट बसवल्यानंतर देखील ज्यादा भाडे घेऊन प्रवाशांची लूट चालवली आहे. जर शेअर रिक्षात ३ प्रवासी मिळाले नाही तरी देखील २ प्रवासीची परवानगी सांगून ५० टक्के जास्त भाडे घेतले जात आहे. भाईंदर पश्चिमेस देखील तशीच परिस्थिती आहे. शेअर भाड्यात प्रवासी ३ ते ५ इतक्या संख्येने बसवण्यात येऊन सुद्धा भाडे मात्र जास्त आकारले जात आहे.

शेअर भाडे मार्ग व त्यानुसार ठरलेले दर याचे अधिकृत फलकच कुठे लावलेले नसल्याने प्रवाश्यांची जाणीवपूर्वक लूट करण्यास मोकळीक दिल्याचे चित्र आहे. वास्तविक भाईंदर रेल्वे स्थानका सह मोक्याच्या ठिकाणी प्रवाशांच्या माहितीसाठी अधिकृत दरपत्रक लावले गेले पाहिजेत. परंतु शेअर भाड्याचे दरपत्रकाचे फलकच कुठे दिसत नाहीत. त्यामुळे रिक्षा चालक सांगतील व मागतील ते भाडे द्यावे लागते. अन्यथा भांडणा शिवाय पर्याय नसतो. प्रवाशांची रिक्षा भाडे वा चालकां बाबत तक्रारी कुठे करायच्या त्याची सुद्धा माहिती लावण्यात आलेली नाही. 

भारती त्रिवेदी ( कर्मवीर रिक्षा चालक मालक संघटना ) - रिक्षा चालकांनी पूर्वीप्रमाणे ३ प्रवासी यानुसार शेअर भाडे घेतले पाहिजे. परंतु काही बेकायदा रिक्षा चालक जास्त भाडे मागतात त्यांच्यावर जरूर कारवाई करावी. परंतु सीएनजी गॅस, स्पेअरप पार्ट, मेंटेनन्सचे दर  खूपच वाढले असून सुधारित शेअर भाडे प्रादेशिक वाहतूक विभागाने तातडीने जाहीर करावे. 

सुरेश खंडेलवाल ( नगरसेवक ) - अनेक रिक्षा चालक ३ - ४ प्रवासी बसवून देखील शेअरभाडे मात्र कोरोना काळातील वाढीव भाडे वसूल करत असल्याच्या तक्रारी होत्या. सदर बाब वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर २ ऐवजी ३ प्रवाशीनुसार भाडे विभागून घेण्यास रिक्षा संघटना व चालकांना सांगण्यात आले आहे. जे जास्त भाडे उकळतात त्यांच्यावर कारवाई केली जावी.

 

Web Title: Arbitrariness of rickshaw pullers in Bhainder; Excessive recovery from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.