सुटीच्या तीन दिवसांचा गैरफायदा घेत मुंब्रा-कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे रेतीचे मनमानी उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 04:20 PM2017-12-23T16:20:15+5:302017-12-23T16:28:24+5:30
सुटीचा गैरफायदा घेत रेतीमाफियांनी शुक्रवारी रात्रीपासून मुंब्रा व कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे मनमानी रेती उत्खनास प्रारंभ केला आहे.
ठाणे : जिल्हा प्रशासनाच्या सुमारे तीन दिवसांच्या सुटीचा गैरफायदा घेत रेतीमाफियांनी शुक्रवारी रात्रीपासून मुंब्रा व कळवा खाडीत सक्शसन पंपव्दारे मनमानी रेती उत्खनास प्रारंभ केला आहे. या खाडी किनारी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणात अवैधरेती साटवणुकीवर मोठी कारवाई होऊनही त्यास न जुमानता रेती माफियांनी सुटीच्या या कालावधीत खाडी पोखरून रेती काढण्याचा सपाटा लावला आहे.
मुंब्रा खाडीतील रेती उत्खननामुळे रेल्वे मार्गास धोका निर्माण झालेला आहे. खाडीवरील ब्रीजवर या रेती उत्खननाचा परिणाम होत असल्याचा रेल्वेचा अहवाल आहे. तरी देखील त्यास न जुमानता शासकीय सुटीच्या कालावधीत बिनधास्त व मनमानी रेती उत्खनन सक्शसन पंपव्दारे केले जाते. यावेळीही चौथा शनिवार, रविवार आणि नाताळ सुटी लक्षात घेऊन खाडी परिसरात रेती काढणारे डोझर, सक्शसनपंप आदीं मोठमोठ्या आवजारांव्दारे रेती काढण्याचे काम रात्रीपासून सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसिलदारांच्या कोणत्याही कारवाईचा या रेतीमाफियांवर किंचितही परिणाम झालेला दिसत नसल्याचे या मनमानी अवैधरेती उत्खनावरून दिसून येत आहे.
अवैध रेती उत्खनन व वाहतून करणाऱ्यां रेतीमाफियांवर एमपीडीएउ लावण्याची सूचना नुकतीच विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहात केली आहे. एवढेच नव्हे तर या आधीच उच्च न्यायालयाने सक्शनपंपव्दारे रेती उत्खनास बंदी घातलेली आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी खाडीतील रेती उत्खननास बंदी घातलेली असतानाही रेतीमाफिये प्रशासनाच्या करवाईचा विचार न करता बिनदिक्कत रेती काढत आहेत.
ठाणे जिल्हा प्रशासनाने पारसिकनगर, डोंबिवली गणेशघाट भागात जेसीबीच्या सहाय्याने अवैध रेतीसाठीचे ४३ हौद तोडले. त्यातील ७८ ब्रास रेतीही शासनाने जप्त केली आहे. कल्याण तहसील कार्यालय, तसेच ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील रेतीगट शाखेचे पथक, व विष्णूनगर पोलीसांनी ही कारवाई केली. या दरम्यान त्यांनी कुंभारखानपाडा गणेशघाट येथे धाड टाकली. याठिकाणी आढळलेला रेतीसाठा त्यांनी ताब्यात घेतला.