रिपाइंच्या युतीवर शिककामोर्तब ?
By admin | Published: October 20, 2015 11:43 PM2015-10-20T23:43:25+5:302015-10-20T23:43:25+5:30
केडीएमसीच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन (आठवले) गटाशी युती झाल्याचा दावा भाजपने केला आहे. रिपाइंचे सरचिटणीस सुरेश बारसिंग यांच्याशी चर्चा झाली असून सत्तेत
कल्याण : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी रिपब्लिकन (आठवले) गटाशी युती झाल्याचा दावा भाजपने केला आहे. रिपाइंचे सरचिटणीस सुरेश बारसिंग यांच्याशी चर्चा झाली असून सत्तेत सन्मानजनक सहभागाचे आश्वासन दिल्याचे प्रसिद्धीपत्रक भाजपा प्रदेश सचिव तथा आमदार नरेंद्र पवार यांनी जारी केले आहे.
मात्र याबाबत आपल्याला काही माहिती नसून बुधवारी भाजपाचे निवडणूक प्रमुख खासदार कपील पाटील यांच्याशी युतीबाबत चर्चा होणार असल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांनी लोकमतला दिली.
भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याचे सांगून रिपाइंचे राष्ट्रीय सचिव दयाल बहादूर यांनी भाजपबरोबर असलेली युती तुटल्याचे जाहीर केले होते. भाजपाकडून रिपाइंला १२ जागा दिल्याची घोषणा झाली होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ५ जागाच सोडल्या आहेत. तसेच ज्या जागा दिल्या आहेत त्या जागांवर भाजपच्या उमेदवारांनी माघार न घेता बंडखोरी कायम ठेवल्याकडे त्यांनी लक्ष वेधले होते. दरम्यान सरचिटणीस बारसिंग यांच्याशी चर्चा झाल्याचा दाखला भाजपाकडून दिला जात असलातरी यासंदर्भात आपणाला काही माहित नसल्याचे बहादूर यांनी लोकमतला सांगितले.
सेनेला गवई गटाचा पाठिंबा
रिपब्लिकन पक्षाच्या गवई गटाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या युतीचे स्वप्न पाहीले होते. ही युतीची वज्रमुठ विरोधकांना नेस्तनाबूत करेल, असा दावा शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी केला आहे.