उधारीचे तीन हजार रुपये न दिल्याने वाद; दोघा भावांच्या मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू
By जितेंद्र कालेकर | Published: February 1, 2024 06:31 PM2024-02-01T18:31:09+5:302024-02-01T18:31:12+5:30
गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने सदोष मनुष्यवधाच्या या गुन्हयात दोन्ही भावांना गुरुवारी अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
ठाणे: उसनवारीने घेतलेले तीन हजार रुपये न दिल्याच्या कारणातून राजकुमार गुप्ता (३०) आणि रोहित गुप्ता (२८) या दोन भावांच्या मारहाणीमध्ये विजय पांडे (५४, रा. रुपादेवी पाडा, वागळे इस्टेट, ठाणे) या रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचच्या पथकाने सदोष मनुष्यवधाच्या या गुन्हयात दोन्ही भावांना गुरुवारी अटक केल्याची माहिती श्रीनगर पोलिसांनी दिली.
वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर येथे राहणारे विजय या रिक्षा चालकाने काही दिवसांपूर्वी रुपादेवी पाडा येथील रहिवाशी राजकुमार गुप्ता याच्याकडून तीन हजार रुपये उसनवारीने घेतले होते. याच उधारीच्या पैशांवरुन या दोघांमध्ये वाद होता. राजकुमार हा विजयकडे वारंवार पैशांची मागणी करीत होता. मात्र, ते देण्यास विजय टाळाटाळ करीत होता. याचा जाब विचारण्यासाठी राजकुमार आणि त्याचा लहान भाऊ रोहित हे दोघेही त्याला शोधत असतांनाच विजय त्यांना ३१ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रुपादेवी मंदिरासमोरील मैदानावरून जातांना दिसला. तेव्हा राजकुमार आणि रोहित या दोन्ही भावांनी विजयला अडवले. त्याच्याकडे पैशांची मागणी करीत त्याला शिवीगाळ करुन मारहाणही केली. त्यानंतर विजयला मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जात कडप्पाने त्याला ढकलत असतांनाच धक्का दिल्याने विजय हा डोक्यावर पडला.
यात डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्रीनगर पोलिस ठाण्यात सुरज विश्वकर्मा (२९, रा. रुपादेवी पाडा, इंदिरानगर, ठाणे) याच्या तक्रारीवरुन दोन्ही भावांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा १ फेब्रुवारी रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आला. दरम्यान, ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाला या दोन्ही भावांची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी गुरुवारी सकाळी या दोघांनाही ताब्यात घेतले. या दोघांनाही श्रीनगर पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी दिली.