शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यास रिव्हॉल्व्हरसह ठाण्यात अटक
By जितेंद्र कालेकर | Published: September 25, 2018 10:29 PM2018-09-25T22:29:47+5:302018-09-25T22:35:55+5:30
उत्तरप्रदेशातून आठ हजारांमध्ये आणलेले रिव्हॉल्व्हर ठाण्यात दहा हजारांमध्ये विक्रीसाठी आणणा-या शितलाप्रसाद मिश्रा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने अटक केली आहे. त्याच्या साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ठाणे : शस्त्रास्त्रांची तस्करी करणा-या शितलाप्रसाद मिश्रा (२१, रा. एल्फीस्टन रोड, मुंबई) याला ठाण्याच्या मॉडेला चेकनाका भागातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून सहा बोअरचे एक रिव्हॉल्व्हरही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट मॉडेला चेकनाका भागात मिश्रा रिव्हॉल्व्हरची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणावरे यांना मिळाली होती. त्या आधारे उपनिरीक्षक शिवराज बेंद्रे आणि श्रीनिवास तुंगेनवार यांच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी मिश्राची एका रिव्हॉल्व्हरसह धरपकड केली. त्याने आठ हजारांमध्ये उत्तरप्रदेशातून या रिव्हॉल्व्हरची खरेदी केली होती. ठाण्यात त्याची तो दहा हजारांमध्ये विक्रीसाठी गि-हाईकाच्या शोधात असतांनाच ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली. उत्तरप्रदेश ते मुंबई आणि ठाण्यात शस्त्रांस्त्रांची विक्री करण्यासाठी मिश्रासह आणखी दोन ते तीन जणांची टोळी कार्यरत असून त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने सांगितले. सध्या त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.